Agriculture ; मॉन्सूनची गाडी वेगाने सुरू झाली

पुणे, सातारा, अलिबागसह महाराष्ट्राच्या आणखी भागात व्यापला

पुणे : मॉन्सूनने रविवारी (ता.६) अलिबाग, सातारा, पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उस्मानाबाद व आणखी काही भागात प्रगती केली आहे. तर बंगालच्या उपसागरावरील शाखेनेही पुढे वाटचाल करत पश्चिम बंगालसह, ईशान्य भारतातील सिक्कीम राज्यांमध्ये मॉन्सून पोचला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

गेल्या २१ मे रोजी अंदमान बेटांवर यंदा एक दिवस उशीराने दाखल झालेला मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले होते. त्यानंतर नियमित वेळेच्या (१ जून) दोन दिवस उशीराने मॉन्सून गुरूवारी (ता. ३) दक्षिण केरळात दाखल झाला. अरबी समुद्राकडून वेगाने वाटचाल करत दोनच दिवसांत मॉन्सूनने महाराष्ट्रापर्यंत मजल मारली. आज (ता.६) तब्बल चार दिवस आधीच पुण्यात हजेरी लावली. मुंबईत मात्र अद्यापही मॉन्सून दाखल झालेला नाही. पुण्यासह मुंबईत मॉन्सून साधारणतः १० जून रोजी दाखल होतो.

रविवारी (ता.६) संपुर्ण कर्नाटक, तामिळनाडूसह, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेशचा काही भाग, संपुर्ण ईशान्य भारत, पश्चिम बंगाल हिमालयाकडील भाग आणि सक्कीम राज्यात मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here