Home Agriculture Ahriculture ; महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कांदा बियाणे 11 जून पासून ऑनलाईन...

Ahriculture ; महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कांदा बियाणे 11 जून पासून ऑनलाईन मिळणार

पुणे (प्रतिनिधी) : गेल्या वर्षी ऑनलाईन नोंदणीला अडचणी आल्याने चालू वर्षी नोंदणी पद्धतीत आणि संगणक प्रणालीमध्ये सुधारणा करून कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच कांदा बियाणे विक्री करण्याचा मानस महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी व्यक्त केला. त्यामुळे संगणक प्रणालीमध्ये योग्य तो बदल करून येत्या 11 जूनला ऑनलाईन पद्धतीने कांदा बियाणे विक्रीचा निर्णय महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरदराव गडाख यांनी घेतला. 


कोरोना विषाणू संसर्गाचा मागील वर्षी उद्रेक झाल्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कांदा बियाणाची विक्री कशी करावी असा प्रश्न विद्यापीठाच्या अधिकारी वर्गाला पडला होता. कारण विद्यापीठाच्या कांदा बियाणाला नेहमीच प्रचंड मागणी असते. बऱ्याचदा बियाणे विक्री पोलीस संरक्षणात सुद्धा करावी लागते. त्यामुळे मागील वर्षी ऑनलाईन पद्धतीने कांदा बियाणे विक्री करण्याचा निर्णय झाला होता. 


मागील वर्षी पोर्टलवर नोंदणी करून नंतर बँकेच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने पैसे भरून नोंदणी पूर्ण केली गेली. परंतु या वर्षी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या ऑनलाईन कंपन्यांच्या नोंदणीप्रमाणेच *फुले ॲग्रो मार्ट पोर्टल* वर नोंदणी करून लगेचच इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड याद्वारे पैसे भरून नोंदणी पूर्ण करता येईल, अशी माहिती बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी दिली. यासाठी https://www.phuleagromart.org या वेबसाईटवर 11 जून पासून ते बियाणे संपेपर्यंत कांदा बियाणे खरेदीची नोंदणी शेतकऱ्यांना करता येणार आहे. प्रति आधारकार्ड, सातबारा उतारा दोन किलो बियाणे या प्रमाणात *फुले समर्थ* आणि *बसवंत 780* या बियाणाची नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी बियाणाचा *दर प्रति किलो रुपये 2000/-* असा असणार आहे. नोंदणी पद्धत अत्यंत सोपी असून आधारकार्ड आणि सातबारा उतारा *https://www.phuleagromart.org* या पोर्टलवर अपलोड करून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी पूर्ण होताच लगेचच इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड यांचे सहाय्याने पेमेंट करून खरेदीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोपर्यंत पोर्टलवर बियाणांची उपलब्धता दिसते तोपर्यंतच बियाणे नोंदणी करावी. पोर्टलवरील बियाणे उपलब्धता संपताच पुढे नवीन नोंदणी व्यवस्थेमध्ये होणार नाही, याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन डॉ.सोळंके यांनी केले आहे.बियाणाची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या संशोधन केंद्रावर (पिंपळगाव बसवंत, धुळे, राहुरी) बियाणे पुरवण्याची व्यवस्था डॉ. प्रमोद बेल्हेकर आणि त्यांच्या विपणन ग्रुपकडून पार पाडण्यात येणार आहे. अश्याप्रकारे बियाणे वाटपात मास्क, सोशल डिस्टंसिंगचा वापर करून कोरोना संसर्गावर मात केली जाणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here