पिकांच्या आरोग्यासाठी शेतकरी जीवावर उदार….

युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी 
पिकांच्या आरोग्यासाठी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष

घारगाव : 


घारगाव येथे युरिया खत मिळवण्यासाठी शनिवारी सकाळी शेतकऱ्यांनी खते एजन्सी दुकानावर गर्दी केली होती. सध्या राज्यात मान्सून सक्रीय झाला असून संगमनेर तालुक्यातील पठारभागात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे.

पिकांची वाढ जोमाने व्हावी यासाठी युरिया खत अत्यावश्यक असल्याने ते मिळविण्यासाठी शेतकरी युरिया मिळतो याची माहिती झाल्यावर लांब लांब जाऊन खताच्या प्रतीक्षेत येताना दिसून येत आहे. गतवर्षी शेतकरी बेमौसमी पाऊस, अवकाळी पाऊस ,चक्रीवादळे झाल्याने शेतकरी संकटात सापडला होता. या सर्व संकटांवर मात करत खरीप पिकांच्या पेरणीसाठी बी-बियाणे ,खतांसाठी पैशांची तजवीज करून खरेदीसाठी लगबग सुरु आहे.

अशा परिस्थितीत युरिया खताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. घारगाव येथील साईनाथ कृषी भांडार येथे शनिवारी सकाळी युरिया खत आल्याचे समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी खते खरेदीसाठी धाव घेतली. खते मिळवण्याच्या नादात झालेल्या गर्दीत कोरोना संसर्गाचा विसर शेतकऱ्यांना पडलेला दिसून आला. एका बाजुला पिकांच्या आरोग्यासाठी खते मिळवण्याची धडपड करत असताना दुसरीकडे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत होते. 


वेळोवेळी कृषी विभाग व खत पुरवठा कंपन्यांकडे मागणी करून शनिवारी आम्हाला ४५० युरिया खताच्या बॅगा मिळाल्या. कृषी विभागाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे एका शेतकऱ्याला प्रत्येकी दोन बॅग वितरीत करण्यात आल्या. शेतकऱ्यांची युरिया खतासाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. – 


सुदीप वाकळे, अध्यक्ष,साईनाथ कृषी भांडार. 


 देशात कोरोनाचा उपद्रव असला तरीही शेतकरी आपल्या शेतकामात व्यस्त आहेत. काहीही झाले तरी शेतीत पेरणी करून उत्पन्न घ्यावेच लागेल. शेतकरी अन्नदाता असून तोही संकटात सापडला आहे. गतवर्षीपासून युरिया खताचा तुटवडा भासत आहे. कृषीमंत्र्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांची समस्या सोडवावी . –

विजय सुपेकर,शेतकरी, नांदूर खंदमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here