जगद्गुरू तुकोबांच्या पालखीचे रोटी घाटात वरूणराजाने केले जंगी स्वागत..

कडेकोठ बंदोबस्तात पालखी पाटस मधून पंढरपुरकडे मार्गस्थ.

.
राजेंद्र झेंडे । राष्ट्र सह्याद्री 
पाटस  ः  जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा यंदा फुलांनी सजावट केलेल्या शिवशाही बस मधून आज पालखी मार्गावरू पंढरपुर कडे मार्गस्थ झाली. हा पालखी सोहळा पाटस, रोटीच्या नागमोडी वळणाच्या घाटातून हिरव्यागार डोंगरातून नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या घाटात आल्यावर वरूणाराजाने या पालखीचे स्वागत केले. रिमझिम पावसाच्या हलक्या सरीचा वर्षाव झाला. डोळ्यात पारणे फिटेल असे हे दृश्य होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांचा ठिकठिकाणी चोख बंदोबस्त असल्याने नागरिकांना पालखीचे दर्शन घेता आले नाही. अनेकांनी लाबुंनच हातजोडून पालखीचे दर्शन घेतले.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर दरवर्षी प्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या लाखो भक्तांच्या सोबत निघणारा पालखी सोहळा मागील वर्षापासून सजावट केलेल्या बसमधून पंढरपुरला जात आहे. यंदाही कोरोनाचे सावट असल्याने फुलांनी सजावट केलेल्या शिवशाही बस मधून संत तुकाराम महाराज यांची पालखी आज सोमवारी (दि.19) दौंड तालुक्यातून पंढरपुरकडे मार्गस्थ झाली. या पालखी सोहळा पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरून पाटस येथील टोल नाक्यावर आगमन होताच अनेकांनी थांबूनच धावत्या बसमधील संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. ही पालखी पावणे बाराच्या सुमारास रोटीच्या नागमोडी वळणाच्या आणि हिरव्यागार डोंगर असलेल्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या रोटी घाटाच्या पायथ्याशी आगमन होताच वरूणाराजीने हजेरी लावली. रिमझिम पावसाच्या सरीचा वर्षाव घाटात या पालखीवर झाला. जणू काय वरूणराजाने या घाटात या पालखीचे जंगी स्वागत केले. हे दृश्य पाहण्याजोगे होते. डोळ्याचे पारणे फिटेल, असे हे दृश्य होते. पावसाच्या सरी झेलत या पालखीचा ताफा रोटीच्या नागमोडी वळणाचा टप्पा पार करीत घाटाच्या वरती जेथे दरवर्षा पालखीचे आरती होत असते तेथे जावून थांबली.
     यावेळी रोटी घाटाच्या वरती संत तुकाराम महाराज पालखीचा दहा ते पंधरा मिनिटे विसवा झाला. येथे संत तुकाराम महाराज यांची आरती घेतली गेली. माऊली तुकाराम यांच्या जयघोषांनी परिसर दणाणून गेला. आरती घेतल्यानंतर ही पालखी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली. मात्र, दरवर्षी प्रमाणे पालखी सोबत असलेली लाखो वारकरी भक्तांची रांग, टाळांचा मृदुगांचा गजर, घाटात फुगड्यांचा खेळ, भक्तीमय वातारवणात दंग झालेले वारकरी हे दृश्य मात्र पाहावयास मिळाले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here