शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडला…

शेतकऱ्यांच्या हाती पुन्हा निराशाच

रांजणी : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्हाळी कांद्यास आगामी काळात चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी चाळीत साठवणूक करून ठेवलेला कांदा खराब होऊ लागल्याने मिळेल त्या भावात कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यामुळे बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होऊ लागली आहे. दरम्यान मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या गोळ्या कांद्याला 170 ते 201 रुपये तसेच मध्यम आकाराच्या कांद्याला 150 ते 170 रुपये आणि गोलटी कांद्याला साधारण 80 ते 120 रुपये बाजार भाव मिळत आहेत.
प्रामुख्याने आंबेगाव, जुन्नर पट्ट्यातील उन्हाळ्यात कांदा पीक प्रामुख्याने घेतले जाते चालू वर्षी बियाणे मिळवण्यापासून ते रोपे टाकण्यापर्यंत तसेच लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्याला विविध संकटांना सामोरे जावे लागले आहे. सततच्या पावसामुळे रोपे खराब झाल्याने रोपांची टंचाई निर्माण झाली झाली होती. तसेच उगवण क्षमता देखील कमी असल्याने बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचे बियाणे मिळेल त्या भावात खरेदी करून शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली होती
मात्र गारपीट अवकाळी पाऊस आणि ऐन गळतीच्या उंबरठ्यावर असलेल्या कांदा पिकावर अवघ्या आठ दिवसात करपा रोगाने थैमान घातले होते चालू वर्षी उन्हाळी कांदा उत्पादनात घट आली असतानाच उरलेल्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेपोटी बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीत भरून ठेवला होता परंतु कांदा आधीच गारपीट व करपा रोगाने बाधित असल्याने चाळीत टाकून दोन ते तीन महिनेही होत नाही तोच साठवणूक केलेला कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षा पल्लवी होत्या मात्र त्या आता धूसर होताना दिसून येत आहेत.
“महागडे बियाणे, तणनाशके रासायनिक खते, लागवड, खुरपणी ते काढणीपर्यंत माझा मोठा खर्च झाला आहे. येणाऱ्या काळात चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने मी कांदा साठवून ठेवला होता मात्र आता नाईलाजास्तव कांदा विक्रीस पाठवावा लागत आहे.” – सयाजी गाडगे, शेतकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here