कोरोनाने वैधव्य आलेल्या महिलांना तातडीने अर्थसहाय्य करा …

नेवासा: 
     या दोन वर्षांत कोरोनामुळे विधवा झालेल्या ५० वर्षे वयाच्या आतील महिलांना शासकीय भरीव अर्थसहाय्य द्यावे, उदरनिर्वाहासाठी रोजगार प्रशिक्षण,  मुलांना शैक्षणिक सुविधा द्याव्यात, अशा कुटुंबाचे सर्वेक्षण करावे, अशा आशयाचे निवेदन नेवासा तालुका कोविड कुटुंब पुनर्वसन समितीच्या वतीने तहसिलदार रुपेश सुराणा यांना देण्यात आले.
    नेवासा तालुका कोरोना विधवा महिला पुनर्वसन समितीचे कारभारी गरड, भारत आरगडे, दत्तात्रय शिरोळे, गणेश लांडे, दत्तात्रय भिंगारे आदिंनी तहसिलदार, गटविकास अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प आधिकारी यांना निवेदने दिली.
        नेवासे तालुक्यातील सुमारे १५० मृत्यू कोरोनामुळे झाले असुन त्यात १०० महिला विधवा झालेल्या आहेत. ५० वर्षे वयाच्या आतील महिला व १८ वर्षाच्या आतील बालके, मुले, मुली यांचे सर्वेक्षण करावे, अशा विधवांना इतर राज्याप्रमाणे भरीव आर्थिक मदत द्यावी. शासकीय योजनांचा लाभ, रास्त भाव धान्य मिळण्यासाठी अंत्योदय रेशन कार्ड,  निराधार पेन्शन योजनेत समावेश, कागद पत्र अपुर्तता असल्यास तातडीने कागदपत्र द्यावीत, घरकुल द्यावे, पतीच्या, सास-याच्या,  दिर, भायाच्या नावावर असणाऱ्या स्थावर व जंगम मालमत्तेत हिस्सा मिळावा, जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत जिल्हा, तालुका व गाव पातळीवार स्वयं रोजगार केंद्र स्थापन करुन त्यांना प्रशिक्षण द्यावे, जिल्ह्यांतील बचत गट, खादी ग्रामोद्योग, कौशल्य विकास विभाग, व उद्योजक यांच्या बैठकीतुन रोजगार निर्मिती साठी प्रयत्न व्हावेत.
 कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या महिलांच्या नावाचे ठराव ग्रामसभेने दिल्यास त्यांना रास्त भाव धान्य देण्यात येईल.
  – रुपेश सुराणा – तहसिलदार, नेवासे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here