परिसरात दोन ठिकाणी चोरी; एका ठिकाणी तर भर दिवसा चोरी…

खैरी निमगांव : (प्रतीनिधी) 
श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगांव येथील जनाबाई घनदाट यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी सुमारे सात तोळे सोन्याची चोरी केली. तर भिमाबाई वारकर यांच्या घरी देखील चाळीस हजार किमतीच्या वस्तुची चोरी झाली. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान खैरी निमगाव येथील जनाबाई घनदाट ह्या आपल्या मुलीकडे संगमनेरला गेलेल्या होत्या. सुनबाई नोकरीकरीता बाहेर होत्या. तर मुलगा महेश मालवाहतुक गाडीचे भाडे घेऊन संगमनेरला गेला होता. तेव्हा तो देखील आपल्या बहीणीकडे मुक्कामी थांबलेला असल्याने चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरावाजाची कडी कोयंडा कटावणीच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश करून मुलगा महेश यांची सोन्याची चैन दोन तोळे, अंगठी अर्धा तोळा, आई जनाबाई यांची सोन्याची पोत दिड तोळा, मोहनमाळ दिड तोळा, कानातील कर्णफुले दिड तोळे, अशी सोन्याच्या वस्तुंची सुमारे सात तोळ्याची चोरी झाली. सुदैवाने रोख रक्कम नव्हती. चोरट्यांनी घरातील बोरचा पाईप कापला तसेच बँक पासबुक फाडले, गॅस पुस्तक फाडले, कपाटाच्या काचा तोडल्या, साडे आठ हजार किमतीचे इंटर नॅशनल घड्याळ तसेच गोडतेल डबा नेला तसेच घरात साखर पांगवून पोबारा केला.  जनाबाई ह्या अंगणवाडी सेवेतुन निवृत्त झाल्याबद्दल त्यांना दिलेले नारळाचे झाडही आदल्या दिवशी चोरीला गेले होते. घटनेची फिर्याद त्यांचा मुलगा महेश यांनी दिली
तर दुसरी घटना भिमाबाई वारकर यांच्या घरी झाली. भिमाबाई वारकर या घरातील सर्व काम आटोपून अकराच्या दरम्यान शेतात गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील आवारातुन घरात प्रवेश करत आत लावलेल्या दरवाजाच्या कडी कोयंड्याना कटावनीने उचकवटून घरात जात घरातील सोन्याच्या वस्तू सहित एकूण चाळीस हजार आठशे रुपयांची चोरी केली, आणी घरातील साड्या इतरत्र फेकुन दिल्या घटनेची माहीती त्यांना घरी आल्यानंतर सायंकाळी सात वाजता समजली. घटनेची फिर्याद भिमाबाई यांनी तालुका पोलीसांना दिली आहे. अधिक तपास पो. नि. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. अडांगळे हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here