करंजी घाटात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला; नातेवाईकांचा शोध सुरू


पाथर्डी प्रतिनिधी : पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट परिसरात एका अंदाजे ४५ वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. संबंधित व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पाथर्डी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
पाथर्डी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजण्याच्या दरम्यान करंजी घाट परिसरात बेशुद्ध अवस्थेत एक मजूर आढळून आला. त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, पाथर्डी येथे दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती संबंधितास मृत घोषित केले.
याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ वर्षे असून वर्ण निमगोरा आहे. केस काळे-पांढरे, बांधा सडपातळ, उंची सुमारे ५ फूट ४ इंच आहे. मिशी वाढलेली, दाढी वाढलेली, नाक सरळ असून अंगात आकाशी रंगाची "LUX VENUS" कंपनीची अर्ध्या बाह्यांची अंडरवेअर असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पाथर्डी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास अथवा त्यांची ओळख पटत असल्यास तात्काळ पाथर्डी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, जेणेकरून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करता येईल.
पाथर्डी पोलीस या अज्ञात मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी विविध स्तरांवर तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या