अहिल्यानगर : शहरातील जुन्या महानगरपालिकेजवळ कोतवाली पोलिसांनी धडक कारवाई करत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या विशाल भिकाजी पारखे ( रा. सारसनगर ) याला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ६० हजार रुपये किमतीचा ३ किलोपेक्षा जास्त गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी अशोक दरंदले यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारसनगर येथील भगवानबाबा मंदिराजवळ राहणारा २४ वर्षीय विशाल भिकाजी पारखे हा तरुण जुन्या महानगर पालिकेजवळ संशयास्पद रित्या फिरत होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये अंमली पदार्थ मिळून आला. त्या गोणीत हिरवट रंगाचा, पाने व फुले असलेला आणि उग्र वास येणारा गांजा आढळून आला. गोणीसह त्याचे एकूण वजन ३ किलो ३५९ ग्रॅम आहे. हा मनोविकारावर परिणाम करणारा अंमली पदार्थ विशाल पारखे याने कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे स्वतःच्या ताब्यात ठेवला होता. पोलिसांनी ६० हजार रुपयांचा हा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे.
या कारवाईची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नितीन देशमुख, पो. उ. नि. गणेश देशमुख यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल चिटणीस करत आहेत. शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
.jpg)
0 टिप्पण्या