अजित पवारांच्या मातोश्रींना आदर्श माता पुरस्कार

 आईने उलगडला अजितदादांचा जीवनप्रवास...


पुणे

“माझ्या मुलांना चांगले वळण लावत मी धाकासोबतच प्रेमाने वाढविले. आमचे सासर आणि माहेरचे कुटुंब मोठे असल्याने भरलेल्या गोकुळात माझे आयुष्य गेले. दिवाळीत आम्ही सगळे एकत्र येतो.

शरद पवारांनी अजित पवारांना उभे केले. सुरुवातीला ग्रामपंचायत, कारखाना त्यानंतर बँक आणि आता प्रत्यक्ष राजकारणातील निवडणूक असा त्याचा प्रवास आहे”, असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनपट सांगताना त्यांच्या मातोश्री आशा पवार यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूस्, पुणे व  डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने तिसरा आदर्श माता पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई अनंतराव पवार यांना बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, गणराज्य संघाच्या अध्यक्षा सुषमा अंधारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. मनोज चासकर, कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात येतो.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, कुटुंबासाठी श्रम व मुलांवर संस्कार अशा प्रकारे कार्य करताना संपूर्ण कुटुंबासाठी आशाताईंनी जीवनदान केले आहे. त्यांच्या अनेक प्रकारच्या ओळखी आहेत. शरद पवार यांच्या वहिनी, सुनेत्रा पवार यांच्या सासू आणि अजित पवार यांच्या मातोश्री अशी त्यांची ओळख आहे. उपमुख्यमंत्री म्हणून आज अजित पवार काम करीत आहेत. प्रत्येकाला सहकार्य करण्यात अत्यंत पुढे आणि गरजेच्या वेळी शाब्दिक अस्त्र देखील ते उगारतात. निर्णय घेण्याची अचूक क्षमता त्यांच्यामध्ये आहे. राजकारणात अनिश्चितता असते, त्यामुळे माय-माऊलींची भूमिका फार महत्वाची असते. कर्त्या नेत्याच्या आई म्हणून आशाताईंनी कार्य केले. अनेक संकटांना तोंड देत त्यांनी मुलांना वाढविले. राजकारणातील दबाव सहन करण्याची ताकद अजितदादांना त्यांच्या मातोश्रींनी दिली.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, आशाताईंचे आयुष्य अत्यंत खडतर होते. त्यामुळे मुलांना घेऊन करावी लागणारी वाटचाल, त्यांनी अनुभविली. आम्हा सगळ्यांना आशाताईंनी घडविले आहे. शरद पवार आज या वयातही काम करतात. त्यांच्याकडे पाहूनच आम्हा सगळ्यांना उर्जा मिळते, असेही त्यांनी सांगितले.

सुषमा अंधारे म्हणाल्या, अजितदादांना घडविणाऱ्या त्यांच्या मातोश्रींचा सन्मान सोहळा वेगळा आहे. काही माणसे पदांमुळे मोठी होतात, काही पदे माणसांमुळे मोठी होतात. परंतु खरी माणसे ही माणसांमुळे मोठी होतात. माणसातील माणुसकी, जिव्हाळा, प्रेम जपणारी माणसे समाजात असणे महत्वाचे आहे. जाधवर इन्स्टिटयूट अशाच पद्धतीने कार्य करीत आहे. माता म्हणून आशाताई सर्वच आघाडीवर पुढे जाणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मानसोहळा वेगळा आहे.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, आशाताई पवार यांनी स्वत: शेतीची काम देखील केली आहेत. अजित पवार यांच्या रुपाने त्यांनी एक रत्न महाराष्ट्राला दिले. आशाताईंनी लहानपणापासून दिलेली शिकवण आणि आत्मविश्वास आज अजित पवार यांच्यामध्ये पहायला मिळतो. अजित पवार यांच्या कार्यामागे त्यांच्या मातोश्रींचे अमूल्य योगदान व मार्गदर्शन आहे. त्यामुळे यावर्षी त्यांना संस्थेतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर यांनी आभार मानले.

‘अजितदादा स्वभावाने प्रेमळ’

“शेतामध्ये माझे आयुष्य गेले. अजित पवार यांना स्वच्छतेची लहानपणापासून खूप आवड होती. वेळेत कामे करण्याची व चांगल्या कामासाठी न थांबण्याची त्याची प्रवृत्ती आहे. आपणही आपल्या मुलांना प्रेम, आपुलकीने वाढविले पाहिजे. तसेच मुलांच्या कलाप्रमाणे त्यांना वाढवावे. अजितदादा स्वभावाने प्रेमळ आहे आणि आज हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो”, असं आशा पवार म्हणाल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या