अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार ; आ. लंके


पारनेर

राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळेल. शेतकरी वर्गाने निश्चींत रहावे अशी ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी दिली.

तालुक्यातील मांडओहळ व काळू धरणाचे जलपूजन रविवारी आमदार लंके यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, जलसंपदा विभागाचे उपविभागिय अभियंता व्हि. टी. शिंदे,शाखा अभियंता ए. बी. मोरे, अशोक कटारिया,

राहुल झावरे, बापूसाहेब शिर्के,संजिव भोर,शिवाजी व्यवहारे,बाळासाहेब खिलारी,अरूण आंधळे, व्हि.एस.उंडे, अंकुश पायमोडे, शिशिकांत आंधळे, संदीप चौधरी, डॉ.बाळासाहेब कावरे, गुलाबराव पाटील, अशोक पवार, रामदास दाते, प्रकाश गाजरे,पांडूरंग जाधव, उमा बोरूडे,मयुरी औटी, दिपाली औटी आदी उपस्थित होते.

आ लंके म्हणाले की, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार,जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा झाली आहे.सर्वांचे पंचनामेे होतील,नुकसान भरपाई मिळेल.एकीकडे करोना व दुसरीकडे अतिवृष्टी या दोन्ही संकटात सरकार आपल्या सोबत असल्याचे आमदार लंके म्हणाले.

मतदारसंघात पाण्याची लढाई सर्वात मोठी आहे.राळेगण सिध्दी, १५ गावांची कान्हूरपठार उपसा जलसिंचन योजना,पुणेवाडी,जातेगांव या योजनांसाठी आपण प्रयत्नशिल आहोत.मतदारसंघातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्वाकांक्षी योजना राबवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार लंके म्हणाले.


जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर

नजिकच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत.राज्यात काय होईल ते होईल. मतदारसंघातील सर्व असंतुष्ट आत्मे आपल्या विरोधात असणार हे निश्चित आहे.त्या सर्वांना आपण चारी मुंड्या चीत करणार आहोत.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यात आघाडी झाली तरी पारनेर-नगर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे सूतोवाच आमदार लंके यांनी  केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या