चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु करण्याबाबत अध्यादेश जारी

बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेतील कार्यक्रमांनाही परवानगी   


पुणे 

राज्यभरातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे हे देखील पुन्हा सुरू होत असून, याबाबतची कार्यपद्धती व नियमांचा अध्यादेश शासनाकडून जारी करण्यात आला आहे. याशिवाय, बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेतील कार्यक्रमांना देखील नियंत्रित स्वरूपात सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रात नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. महसूल, वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या प्रचलित मार्गदर्शक तत्वांनुसार नाट्यगृहांचे नियमन केले जाईल, असे आदेशात म्हटले आहे. 

राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यात जमा असून, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून विविध निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच, करोना काळात बंद करण्यात आलेल्या इतर बाबी देखील पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे. मात्र, करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबर २०२१ नंतर आरोग्याचे नियम पाळून खुले करण्यास परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा २५ सप्टेंबर २०२१ रोजी केलेली आहे. या घोषणेच्या अनुषंगाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नमूद केलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्याच्या अधीन नाट्यगृहे नियंत्रित पध्दतीने सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. ही परवानगी देणयामागील शासनाचा हेतू विचारात घेऊन सर्व संबंधितांनी नाट्यगृहांचे परिचालान कोरोना संदर्भातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधांचा भंग होणार नाही, अशा पध्दतीने करणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक तत्वांचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

स्थानिक कोरोना परिस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकारी संबंधित शासकीय यंत्रणांशी विचारविनिमय करून निर्बंधांमध्ये वाढ करू शकतील. सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार प्रवेशद्वारे व समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात. नेमलेल्या व्यक्तींना पडदा, पडद्यामागील वस्तू इत्यादी हाताळण्याची परवानगी देण्यात येईल. नाट्य कलाकार आणि कर्मचारी यांनी नियमितपणे त्यांची स्वत:ची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, अशी सूचना देण्यात येत आहे. सर्व देखाव्यांची व कलाकारांसाठी असलेल्या कक्षांची दररोज धूम्र फवारणी करण्यात आली पाहिजे. देखावे, प्रसाधनगृहे आणि रंगभूषा कक्ष यांच्या नियमित स्वच्छतेबाबत वेळापत्रक आखावे, स्वच्छतागृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी. मास्कचा वापर बंधनकारक, सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, अतिथींना कलाकारांच्या कक्षात परवानगी दिली जाणार नाही.

तसेच, प्रेक्षागाराबाहेर, सामाईक क्षेत्रांमध्ये आणि प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये नेहमी किमान सहा फूट इतके पर्याप्त सुरक्षित अंतर राखावे. गर्दी होऊ नये म्हणून लोकांना अंतर ठेवून रांगेन बाहेर सोडले जावे. नाट्यगृहांचा वापर त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक करण्यात येणार नाही. सर्व वातानुकूल उपकरणांचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे. आदी सूचना करणयात आलेल्या आहेत.

सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची, आयोजकांची जबाबदारी असेल. बंदिस्त सभागृहाच्या एकुण बैठक क्षमतेच्या ५० टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये. बंदिस्त सभागृहातील व्यासपीट व प्रेक्षकंमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे (किमान ६ फूट) आवश्यक राहील. बालकलाकारां व्यतिरिक्त सर्व कलाकार, आयोजक व साह्यभूत कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण ( दोन डोस व दुसऱ्या डोस नंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल. ) झालेले असणे आवश्यक असेल. तसेच, प्रेक्षकंचे कोविड प्रतिबंध लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती सुरक्षित अशी दर्शवलेली असणे आवश्यक राहील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या