विजयादशमीच्या मुहुर्तावर धोनी करणार विश्वविक्रम

कर्णधार म्हणून ३००वा सामना खेळणार 


दुबई

आयपीएल २०२१ची फायनल मॅच आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. ही लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार असून यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी  ३००वा सामना खेळणार आहे. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी आजवर कोणी केलेली नाही. 

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. त्याच बरोबर चेन्नईने टी-२० चॅम्पियनस लीगचे दोन वेळा विजेतेपद मिळवले आहे. कर्णधार म्हणून धोनीने भारतीय संघाला वर्ल्डकप जिंकून दिला आहे. १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आयपीएलच्या फायनल सामन्यात धोनी जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा तो टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ३००वा सामना खेळेल. धोनीने टी-२० मध्ये आजवर २९९ सामन्यात नेतृत्व केले आहे. यापैकी १७६ सामन्यात विजय तर ११८ लढतीत पराभव स्विकारला आहे.

 चेन्नईने आतापर्यंत ३ वेळा तर कोलकाताने २ वेळा विजेतेपद मिळवले आहे. यावेळी चेन्नईला चौथे तर कोलकाताला तिसरे विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. केकेआरने २०१२ साली अंतिम फेरीत चेन्नईचा पराभव केला होता. तर दुसऱ्यांदा २०१४ साली पंजाबचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते. चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ अशी तीन विजेतेपद मिळवली आहेत.

२०१२ साली केकेआरने अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. तेव्हा चेन्नईने १९० धावांचे लक्ष्य दिले होते. चेन्नईने २० षटकात ३ बाद १९० धावा केल्या होत्या. उत्तरा दाखल केकेआरने २ चेंडू राखून विजय साकारला होता. तेव्हा मलविंदर बिस्लाने ८९ तर जॅक कॅलिसने ४९ चेंडूत ६९ धावा केल्या होत्या.

धोनी काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या मैदानावर चाहत्यांच्या समोर अखेरचा सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्याच बरोबर तो हे देखील बोलला होता की पुढे काही होईल माहिती नाही. मेगा लिलाव होणार आहे. त्यानंतर कशी रणनिती आखली जाईल, हे आताच सांगू शकत नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या