दहशतवादाच्या बीमोडासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा सक्रिय

एनआयएचे दिल्ली, काश्मीरमधे छापे


श्रीनगर

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) सक्रिय झाली असून, द रेझिस्टन्स फोर्स व पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या भूमिगत कार्यकर्त्यांच्या 18 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. हे भूमिगत कार्यकर्ते जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, अल बद्र आणि इतर संघटनांशी संबंधित आहेत. 

काश्मीर खोऱ्यात नागरिकांवर आणि इतरांवर अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे या संघटनांचा हात असल्याचे म्हटले जाते आणि हे भूमिगत कार्यकर्ते त्यांना मदत  करत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. एनआयएने जम्मू -काश्मीरमधील वातावरण बिघडवल्याबद्दल 10 ऑक्टोबर रोजी नवीन एफआयआर नोंदवला आहे. या अंतर्गत आता कारवाई सुरू झाली आहे. मंगळवारी, एनआयएने दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश आणि जम्मू -काश्मीरमधील 18 ठिकाणी छापे टाकले. जम्मू -काश्मीरमध्ये, गलबुह काकापोरा येथील रहिवासी अब खलिक दारचा मुलगा ओवैस अहमद दार यांच्या घरावर छापा टाकला. काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या नागरिकांच्या हत्येनंतर दहशतवाद्यांविरोधातील कारवाईचा हा एक भाग आहे, असे सांगण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या