Breaking News

आक्षेपार्ह घोषणाबाजीमुळे श्रीरामपुरात दंगलसदृश्य तणाव


प्रतिनिधी  राष्ट्र सह्याद्री

श्रीरामपूरः कोजागिरी पौर्णिमा व ईद -ए मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर काल शहरात काही उणाडटप्पूंच्या जमावाने जोर- जोरात घोषणाबाजी केल्याने दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध ठाकल्याने काहीवेळ जणू दंगलसदृश्य तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसले. 

श्रीरामपूर शहरात तसे पाहता काही  अनुचित प्रकार घडत नाहीत. अति उत्साही युवकांमुळे तणावाचा  प्रकार घडला. तरी कोणीही अफवा पसरवू नये.कोणी यापुढे कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने चुकीचे काम करणार असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणारच,    असा इशारा अप्पर पोलीस अधिक्षिका डॉ. दीपाली काळे यांनी दिला. यावेळी जमावातील काहींनी मोटारसायकल रॅली काढल्याने वातावरण चांगलेच तापले,  परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने चिघळणारी परिस्थिती  नियंत्रणात आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास   सोडला. दरम्यान, शहरासह परिसरातील राजकीय, सामाजिक नेते मंडळी व पोलीस प्रशासनासह नागरिकांनी सामोपचाराची भूमिका घेत शहरातील जातीय सलोख्याला कुठलेही गालबोट लागू न दिल्याने पुन्हा एकदा येथील सामाजिक ऐक्याचा समाधानकारक प्रत्यय आला. काल दिवसभर शहरातील काही ठिकाणी स्थानिक व राज्य राखिव दलाच्या पोलिसांच्या तुकड्या दाखल झाल्याने जणू छावणीचे स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसले.  काल (मंगळवारी) देशभर मुस्लिम बांधवांचा ईद -ए मिलाद व हिंदूंची कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरा होत असताना अचानक काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी गैरवर्तन करुन, जोर-जोरात अनपेक्षित घोषणाबाजी केल्याने  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे चित्र निर्माण झाले, परंतु डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व पोलीस कर्मचाऱ्यांनी सय्यद बाबा दरगाह चौकात पोलिसांची साखळी करून, हा जमाव रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना यावेळी धक्काबुक्की करण्यात आल्याने काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये गोंधळ  निर्माण झाला. या गोंधळाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रसंगावधान राखून वेळीच लाठीचार्ज करत चिघळणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

या तणावानंतर शहरातील काही हिंदू संघटनांनी एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली, मात्र अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी वेळीच या युवकांना थांबवले. यावेळी दोन्ही समाजातील प्रमुख बड्या नेत्यांना एकत्र बोलावून त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्वांना शांततेचे आवाहन करुन,  शहरामध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. या बैठकीस आ. लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर , नागेश सावंत, राजेंद्र सोनवणे ,संजय छल्लारे ,रवी पाटील, प्रकाश चित्ते ,सुरज आगे, तिलक डुंगरवाल, सागर बेग, बाबा शिंदे, नगरसेवक अंजुमभाई शेख, मुजफ्फर शेख, मुन्ना पठाण , मुक्तार शहा ,अहमद जागीरदार आदी नेते, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments