Breaking News

..तोपर्यंत कर्जमुक्ती शक्य नाही : पवार


बापू मुळीक । सासवड 

राज्यावर कोरोना, वादळे, महापूर, अतिवृष्टी, अशी संकटे येत आहेत. यात भरडलेला शेतकरी जगला पाहिजे म्हणून विकासकामांना कात्री लावून मदत करत आहोत. मात्र सध्या कर्जमुक्ती करणे शक्य नाही. राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी बसल्याशिवाय कर्जमुक्तीचा विचार करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गव्हाणपूजन व गाळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते.

पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे व सोमेश्वरचे माजी माजी उपाध्यक्ष सुधाकर टेकवडे यांच्या जवळार्जुन गावाला काहीही कमी केलं नव्हतं. कारखान्याचा डायरेक्टर दिला, व्हाईस चेअरमनपद दिलं, तरीही सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत तेथील बुथवर माणसं नव्हती. सर्वांत कमी पन्नास टक्के मतदान तीथं झालं. जवळार्जूनच्या लोकांना आणि पुढाऱ्यांना बरीच कामं असतात, पुढच्या वेळेला आमच्या काटेवाडीतून बुथ सांभाळायला माणसं पाठवतो, अशा कडक शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कमी मतदान झाल्याबद्दल तेथील नेतेमंडळींची वाभाडे काढले.  सर्वाधिक मताधिक्य दिल्यबद्दल सोमेश्वरच्या सभासदांचे त्यांनी आभारही मानले. पण, ते करत असताना ज्या ठिकाणी नेतेमंडळींनी हलगर्जीपणा दाखवली, त्यांची हजेरीही अजित पवार यांनी घेतली.

ते म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील नाझरे (क.प.), जेजुरी, तसेच बारामती तालुक्यातील शिरष्णे आणि मोरगाव येथील बूथवर अत्यंत कमी टक्केवारीने मतदान झाले आहे. जवळाजूर्न गावाला तर मागील काळात सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक, उपाध्यक्षपदही दिले होते. सुधाकर टेकवडे यांच्या रूपाने गावाला कारखान्याचे उपाध्यक्षपद मिळाले होते. पण तेथील बूथवर लोक नव्हती, अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली. दरम्यान, मिळालेल्या मताधिक्याबद्दल मतदारांना त्यांनी चांगल्या कामाची ग्वाहीही दिली. मला बारा हजारांचे मताधिक्य अपेक्षित होते; तुम्ही सोळा हजारांचे दिले आहे. ज्यांनी हे ओझे माझ्यावर टाकले आहे, त्यांच्या कष्टाचे चीज होईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. मी सांगता सभेत म्हणालो होतो, इतकी मतं द्या की मतांच्या ओझ्याने मी वाकलो पाहिजे. पण तुम्ही इतकी मतं दिली की त्या मताच्या ओझ्याने मी नुसता वाकलो नाही तर पार झोपलो, अशी सोमेश्वर कारखान्याच्या मतदारांची प्रशस्ती अजित पवार यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते. या प्रसंगी आमदार संजय जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, डॉ. दिगंबर दुर्गाडे, डी. के. पवार, संभाजी होळकर, राजवर्धन शिंदे, शहाजी काकडे, प्रमोद काकडे, नीता फरांदे, तुकाराम जगताप उपस्थित होते.


No comments