आ. निलेश लंके यांचा जिवनपट चित्रपटातून उलगडणार


प्रतिनिधी  राष्ट्र सह्याद्री

पारनेर : राज्याच्या राजकारणातील एक सामाजिक चेहरा म्हणून पुढे येत असलेल्या आमदार नीलेश लंके यांचा जिवनपट चित्रपटाद्वारे उलगडणार आहे.रविवारी,२४ ऑक्टोबर रोजी संत परंपरेतील अखेरचे संत निळोबारायांच्या समाधीस्थळी, पिंपळनेर (पारनेर) येथे चित्रपटाच्या नावाची घोषणा होणार आहे.

लोकवर्गणीतून तब्बल ६० हजार मतांच्या मताधिक्क्याने विधानसभेत पोहचलेल्या आमदार नीलेश लंके यांच्या जिवनावर आता चित्रपट प्रदर्शीत होणार आहे. चित्रपट निर्मात्याने आमदार लंके यांच्या जिवनावर ९०० पानांची पटकथा लिहिली असून आमदार लंके यांचा इयत्ता पाचवी पासून ते शरद पवार आरोग्य मंदीरापर्यंतचा प्रवास या चित्रपटामध्ये चित्रीत करण्यात येणार आहे. 

आमदार लंके, त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्या राणी लंके यांच्या उपस्थितीत चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.आमदार लंके यांची भूमिका साकार करण्यासाठी त्यांच्याशी साधर्म्य असलेल्या अभिनेत्याचा शोध घेण्यात आला आहे.मराठी व हिंदी भाषांमध्ये हा चित्रपट चीत्रित होणार आहे.एकाच वेळी १ हजार चित्रपटगृहांमध्ये तो प्रदर्शित करण्याची योजना आहे.  

विधानसभा निवडणूकीत ऐतिहासिक विजय संपादन केल्यापासून आमदार नीलेश लंके यांचे नाव राज्यभर चर्चेत आहे. विधानसभेचे तत्कालीन उपसभापती विजय औटी यांचा धक्कादायक पराभव करून आमदार लंके 'जायंट किलर' ठरले. 

दीड वर्षांपूर्वी जगात, देशात व राज्यात करोना महामारीचे संकट उभे राहिले. त्यानंतर खऱ्या अर्थाने आमदार लंके प्रकाश झोतात आले.संसर्गाच्या पहिल्या लाटेत कर्जुले हर्या येथे शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर या नावाने कोविड उपचार केंद्र सुरू करून आमदार लंके यांनी मतदारसंघासह राज्यातील रूग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली. १ हजार बेडच्या या आरोग्य मंदीरातून हजारो रूग्ण बरे होऊन घरी गेले. 

दुसऱ्या लाटेत वेळी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आमदार लंके यांनी शरद पवार यांच्याच नावाने भाळवणी येथे जिल्ह्यातील पहिले कोविड उपचार केंद्र सुरू केले. लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या उपचार केंद्रासाठी देश विदेशातून देणगी जमा झाली.आमदार लंके रूग्णांमध्ये वास्तव्य करून त्यांना आधार देण्याचे काम करीत असल्याने तो कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला.

राज्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी भाळवणी येथील कोविड उपचार केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.आमदार लंके यांच्या कामाचे कौतुक केले.

समाजासाठी सर्वस्व झोकून दिलेल्या आमदार लंके यांच्या जिवनावर आता चित्रपट प्रदर्शीत होणार असून त्याविषयी सर्वत्र कुतूहल आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या