सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित नवा नियम 1 डिसेंबरपासून लागू, पालन न झाल्यास होणार तुरुंगवास



नवी दिल्लीः भारतात सोन्यात गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम मानले जाते. प्रत्येक सण आणि लग्नात सोन्याची खरेदी आवर्जून केली जाते. खरं तर लोक प्रत्येक पैन अन् पैची कमाई जोडून सोने खरेदी करतात. पण आजही सोने खरेदी करताना त्याच्या शुद्धतेबाबत अनेक चिंता आहेत. सोने शुद्ध आहे, त्यात काही भेसळ तर नाही ना, कारण अशी अनेक प्रकरणे समोर येतायत, ज्यात ज्वेलर्स भेसळयुक्त सोने देतात आणि पैसे कमावतात.

हॉलमार्क सरकारकडून अनिवार्य करण्याचा निर्णय

गेल्या काही वर्षांत दागिन्यांच्या शुद्धतेसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा शब्द म्हणजे हॉलमार्क हा आहे. जे सरकारने अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळून अशा प्रकारांना आळा बसू शकतो. 1 डिसेंबरपासून म्हणजेच उद्यापासून तुमच्या सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित असा नियम लागू होणार आहे, ज्याचे पालन न केल्यास तुरुंगवास होऊ शकतो.

उद्यापासून हॉलमार्किंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा

ज्वेलर्सना 30 नोव्हेंबरपर्यंत दिलेली सवलत देण्याची मुदत आज संपणार आहे, म्हणजेच आता हॉलमार्किंगचे नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक आहे, असे न केल्यास ज्वेलर्सवर कडक कारवाई केली जाऊ शकते. देशभरातील 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलेय. या अंतर्गत ज्या ज्वेलर्सची उलाढाल 40 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा त्यांनी नोंदणी केलीय, त्यांच्या दुकानातील प्रत्येक दागिन्यावर हॉलमार्क असणे आवश्यक आहे. याशिवाय विकल्या जाणाऱ्या सर्व दागिन्यांवर हॉलमार्किंगही बंधनकारक आहे.

ज्वेलर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे

त्याचबरोबर ज्वेलर्ससाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही तयार करण्यात आलीत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या दुकानाबाहेर एक डिस्प्ले बोर्डही लावला जावा, ज्यामध्ये या दुकानात हॉलमार्क केलेले दागिने उपलब्ध आहेत, असे लिहावे. ग्राहकांना हॉलमार्क दाखवण्यासाठी दुकानातच 10x चा ग्लास आणि हॉलमार्किंग शुल्क लिखित स्वरुपात असलेला चार्ट तयार करणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक दुकानात बीआयएस क्रमांक आणि पत्ता देणे आवश्यक आहे.

हॉलमार्किंगही तपासले जाणार

यासोबतच बीआयएसने नियुक्त केलेले काही एजंटही दुकानात जाऊन हॉलमार्किंग, दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग योग्य प्रकारे झाले आहे की नाही, याची तपासणी करणार आहेत, त्यासाठी दुकानांमधून नमुने घेतले जातात. उद्यापासून हॉलमार्किंगची अंमलबजावणी न केल्यास कारवाईही केली जाणार आहे. याआधीही याबाबत सातत्याने चौकशी केली जात होती, मात्र आता ती अनिवार्य करण्यात आलीय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या