विलीनीकरण शक्य नसले तरी वेतनवाढ करणार : परब


मुंबई 

एसटी कामहारांच्या मागण्यांबाबत समितीचा अहवाल लवकर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विलिनीकरणाबाबत समितीचा अहवाल सकारात्मक आला, तर शासन तो मंजूर करेल. परंतु जर समितीने नकारात्मक अहवाल दिला तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीबाबत सरकार सकारात्मक असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.

शनिवारी सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबतची बैठक झाली. परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ यांच्यात ही बैठक पार पडली. त्यानंतर अनिल परब यांनी ही माहिती दिली.

परब म्हणाले, “बऱ्याच दिवसांपासूनचा वेतन वाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. साधारण सर्व कामगारांची मानसिकता अशी आहे, की शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळाले पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, किती त्यावरती आपण बोझा घेऊ शकतो? इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे सर्व गोष्टी करायच्या असतील तर, एकंदरीत अभ्यास करून निर्णय घेण्याबाबत शासन सकारात्मक आहे. असं मी सांगितलेलं आहे.” असं परब यावेळी म्हणाले.

याचबरोबर, “त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या, त्याबाबत शासानाने सकारात्मक विचार ठेवलेला आहे. आता कामगारांशी चर्चेसाठी ते(कामगारांचं शिष्टमंडळ) गेलेले आहेत आणि कामगारांशी चर्चा करून पुन्हा एकदा भेटण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. मी माझ्याकडून सर्व प्रयत्न केलेले आहेत. संपकरी कामगारांनी संप लवकरात लवकर संप थांबवून कामावर येण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आमची कामगारांना एकच विनंती आहे. एखादी गोष्ट न्यायप्रविष्ठ असतान आडमुठे धोरण स्वीकारून कृपया हा संप अधिक वाढवू नये. कारण, एसटी अत्यंत नुकसानीत आहे. तिला त्यातून बाहेर काढण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला कामगारांनी देखील मदत केली पाहिजे.” असं आवाहन देखील परिवहनमंत्र्यांनी केलं.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या