पाथर्डी व शेवगाव शहराच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेस मंजुरी

आ. राजळे यांच्या प्रयत्नाला यश


पाथर्डी प्रतिनिधी

पाथर्डी व शेवगाव शहराला सध्या पाणी पुरवठा करणारी पाथर्डी शेवगाव व ५४ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अत्यंत जुनी झाल्याने शेवगाव व पाथर्डी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आमदार मोनिका राजळे ह्या २०१८ पासून या दोन्ही शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजुर होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होत्या. आज या प्रयत्नाला यश येवून शासन निर्णय निर्गमीत झाला आहे. पाथर्डी शहर पाणी पुरवठा योजना प्रल्पासाठी रु ७३ कोटी ४७ लाख व शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनासाठी ६७ कोटी २७ लाख रुपयांच्या योजनेस मंजुरी मिळाली.

शेवगाव पाथर्डी व 54 गावे पाणीपुरवठा योजना अत्यंत जुनी झाल्यामुळे कधीकधी शहराला आठ ते पंधरा दिवस पिण्याचे पाणी मिळत नव्हते, त्यामुळे मोनिका राजळे आमदार झाल्यानंतर प्राधान्याने करावयाच्या कामांमध्ये या दोन्ही शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करनेकामी त्यांनी प्रयत्न सुरू केले, त्यानुसार 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगर विकास विभाग असताना या पाणी पुरवठा योजनांचा प्रस्ताव सादर करण्यात आला, त्यावेळी तत्कालीन मंत्री पंकजाताई मुंडे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून पाथर्डी शहरासाठी पहिली तांत्रिक मंजुरी ११ डिसेंबर २०१८, दुसरी तांत्रिक मंजुरी ९ जुलै २०१९ व तिसरी तांत्रिक मंजुरी ५ ऑगस्ट २०१९ तर शेवगाव शहरासाठी पहिली तांत्रिक मंजुरी ११ डिसेंबर २०१८, दुसरी तांत्रिक मंजुरी ९ जुलै २०१९ व तिसरी तांत्रिक मंजुरी ६ ऑगस्ट २०१९ याप्रमाणे मिळाली होती व २१ सप्टेंबर 2019 मध्ये या दोन्ही पाणीपुरवठा योजनेस शासनाने तत्वत: मान्यता दिली.  परंतु त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या व सत्तांतर झाले व मार्च 2020 मध्ये covid-19 मुळे लॉकडाऊन तसेच वैद्यकीय सेवेसाठी शासनाने सर्व योजनांना  तात्पुरती स्थगिती देऊन कोरोना  उपचारासाठी वैद्यकीय सेवेकडे निधी वळविला, त्यामुळे या योजनांना विलंब होत गेला, या विलंबामुळे व दरवर्षीच्या डीएसआर किमती बदलत गेल्याने 2020  व  2021 यावर्षी प्रकल्पाच्या किमतीत बदल होऊन मोठी वाढ होत गेली. त्यामुळे या दोन्ही योजनांची अंदाजपत्रके पुन्हा पुन्हा तयार करावी लागली. मागील सहा महिन्यापासून आमदार मोनिका राजळे व दोन्ही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे यांनी शासनाकडे पाणीपुरवठा योजना मंजूर होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला, यासाठी मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकर गडाख यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पाणीपुरवठा योजना होणे किती आवश्यक आहे हे त्यांचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आज प्रत्यक्षात तीन वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर व विविध अडचणी पार पाडून शेवगाव व पाथर्डीला शहराला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर झाली.

 महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत शेवगाव शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे शासन निर्णय आज पाथर्डी चे नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके व आमदार मोनिका राजळे यांचे स्वीय सहायक सुरेश बाबर यांनी हे शासन निर्णय मुंबई येथे ताब्यात घेतले.

 शेवगाव  व पाथर्डी शहरासाठी स्वतंत्र नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने दोन्ही शहरामध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण असून या  योजना मंजूर होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ,  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख  यांचे खूप सहकार्य मिळाले. त्याबद्दल आमदार मोनिका राजळे यांनी सर्वांचे आभार मानले.  ही माहिती आमदार मोनिका राजळे यांनी आज दोन्ही तालुक्याच्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या