संतप्त जमावाचा पोलिसांवर हल्ला



बारामती : बारामतीतील सोनगाव येथे पोलीस पथक अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई करताना धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस कारवाईसाठी गेले असताना भितीपोटी एकाने पळ काढत निरा नदीवरील बंधाऱ्यात उडी मारली. यावेळी दम लागल्याने बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मंगलेश अशोक भोसले (वय ४५, रा. सोनगाव) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. दरम्यान या घटनेनंतर संतप्त झालेल्या संबंधित वस्तीवरील जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोनगाव येथील अवैध दारु धंद्यावर कारवाईसाठी बारामतीच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक गेले होते. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच मंगलेश भोसले याने भितीपोटी पळ काढला. लगतच्या निरा नदीवरील बंधाऱ्यात उडी मारत पलीकडील तीरावर पोहून जात निसटण्याचा प्रयत्न केला. परंतू पोहताना दम लागल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला.

मंगलेश भोसलेचा मृत्यू झाल्यामुळं संतप्त झालेल्या वस्तीवरील जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यात तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेमुळे सोनगावातील स्थिती अधिकच चिघळली आहे. पोलिसांनी जादा कुमक मागवत घटनास्थळी ती पाठवली आहे. सद्यस्थितीला गावात तणावाचे वातावरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या