भोंदू महाराजाच्या मठावर छापा : आरोपीस अटक

४१ किलो गांजा व सांबर प्राण्याचे शिंगे व कातडे जप्त 


कवठे येमाई 

शिरूर तालुक्यातील काठापूर खुर्द येथे एका मठावर शिरूर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात गांजा सारखा अंमली पदार्थ व प्राण्यांच्या शिंगांची तस्करी करणार्‍या भोंदू महाराजाच्या मुसक्या आवळण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी आरोपी शांताराम ढोबळे उर्फ बापु महाराज यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.    

या बाबत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिलेल्या माहिती नुसार काठापूर खुर्द येथे मठात राहून गांजा जवळ बाळगणाऱ्या तसेच गांजा लागवड करणाऱ्या भोंदू महाराजाच्या मठावर छापा टाकून पोलिसांनी ४१ किलो गांजा व सांबर जातीच्या प्राण्याचे शिंगे व कातडे जप्त केली आहेत. 

यातील आरोपी शांताराम ढोबळे उर्फ बापु महाराज यास अटक करण्यात आली असून गांजा, सांबराची शिंगे,कातडी असा २ लाख ५७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरूद्ध एनडीपीएस व वन्य जीव संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राऊत यांनी दिली. 

शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काठापूर खुर्द येथे हनुमान मंदिर व परिसरात सदर भोंदू महाराज गांजा जवळ बाळगून असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शिरूर पोलिसांनी छापा टाकला असता,त्या ठिकाणी मठ चालवणारा महाराज शांताराम ढोबळे यांच्या मठातून तयार १० किलो गांजा, व परिसरात गांजाची झाडे असा एकूण ४१ किलो ४४५ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला.तसेच पोलिसांनी अधिक तपासणी केली असता, गोनीमध्ये लपवून ठेवलेले सांबर जातीच्या प्राण्याची ३ शिंगे,कातडे हे देखील मिळून आले. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,सुरेश गिते,पोलिस नाईक नितीन सुद्रिक, निलकंठ कारखेले, नाथसाहेब जगताप,बाळू भवर यांच्या पोलीस पथकाने केली. अधिक तपास शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत करीत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या