Breaking News

महाराष्ट्ची 'ॲक्सेस ट्यूरिझम'कडे वाटचाल


पुणे प्रतिनिधी

अनलॉकनंतर इतर क्षेत्रांप्रमाणे पर्यटनाला देखील चालना मिळत आहे. त्यामुळे सध्या गडकिल्ल्यांना भेट देण्यासाठी पर्यटकांचा कल वाढला आहे. मात्र वाढलेल्या पर्यटनामुळे गडकिल्ल्यांच्या परिसरात कचऱ्याचे प्रमाण देखील वाढत असून 'ओव्हर ॲक्सेस ट्यूरिझम'कडे वाटचाल होत आहे.

त्याचबरोबर येथील वास्तू आणि जैवविविधतेवरही परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनाबरोबर पर्यटनाला योग्यरीत्या चालना देण्यासाठी 'कंट्रोल ट्युरिझम'ची अंमलबजावणी करण्याचे असल्याचे पर्यावरण प्रेमी आणि गिर्यारोहक संस्थांनी नमूद केले आहे.

याबाबत अखिल महाराष्ट्र गिर्यारण महासंघाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी सांगितले, ''साहसी पर्यटन, भटकंतीकडे नक्कीच लोकांचा कल वाढत आहे. मात्र प्रत्येक किल्ल्याची एक क्षमता असते. किल्ल्यांना भेट देण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. यामुळे किल्ल्याच्या वास्तूंना धोका पोचतो. किल्ल्याचे दगड ढासळतात, जास्त गर्दीमुळे किल्ल्याला नीट पाहता येत नाही. तसेच अपघात देखील होतात. त्याचबरोबर पर्यटकांच्या वर्दळीमुळे किल्ल्यांवरील शांतता भंग होते. अलीकडे असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठीची यंत्रणा निर्माण करण्यासाठी शासनाकडे लवकरच प्रस्ताव मांडणार आहोत.''

सह्याद्रीचे गड किल्ले जैवविविधतेनी परिपूर्ण आहेत. या ठिकाणी काही विशिष्ट प्रकारचे प्राणी, पक्षी, किटक, वनस्पती आढळून येतात जे इतर कोठेही उपलब्ध नसतात. मात्र वाढत्या पर्यटकांमुळे येथील निसर्गाचा ऱ्हास आणि जैवविविधतेच्या अधिवासाला धोका पोचतोय. ब्ल्यूटूथ स्पीकर्स, कॅम्पींग, वाहनांची वर्दळ अशा कारणांमुळे जैवविविधतेवर परिणाम होतो. अंबोली घाटात नुकतेच अंबोली कॅटफीश' या माशाच्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. हा मासा संपूर्ण जगात केवळ अंबोली येथील हिरण्यकेशी मंदिर येथून उगम होणाऱ्या हिरण्यकेशी नदीत आढळतो. मात्र पर्यटकांकडून या नदीत अंघोळ, निर्माल्य, कचरा आदी गोष्टी टाकण्यात येतात. याचा परिणामी ही प्रजाती नामशेष होऊ शकते. त्यामुळे जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून कंट्रोल ट्युरिझम गरजेचे असल्याचे सह्याद्रीविषयक अभ्यासक अनिश परदेशी यांनी सांगितले.


No comments