एक गोष्ट मान्य केली, आणखीही करतील...

भाजपचे मोहीत कंबोज यांचे मलिक यांना प्रत्युत्तर  


मुंबई 
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा मुळ सुत्रधार हा सुनिल पाटील हाच असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे मी कालच जाहिर केले. तसेच सुनिल पाटील आणि मलिक यांच्या संबधाबाबत मी बोललो होतो. त्यातील त्यांनी सुनिल पाटील याचा फोन आल्याची गोष्ट मान्य केली. आता थोडे थांबा बाकिचेही ते मान्य करतील असा उपरोधिक टोला भाजपा नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांना लगावला आहे , ललित हॉटेलमध्ये सुनिल पाटील यांना भेटायला कोण जात होतं असा सवालही त्यांनी नवाब मलिक यांना केला.
दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी आर्यन खान प्रकरणात मोहित कंबोज हाच मुख्य कटाचा सुत्राचा सुत्रधार असल्याचा आरोप केला. त्यानंतर मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिले.
त्यावेळी बोलताना मोहित कंबोज म्हणाले की, मागील अनेक दिवसांपासून मलिक हे सुनिल पाटील यांच्या निमित्ताने अनेक गोष्टी लपवित होते. तसेच खरी स्टोरीही लपवित होते. मात्र आता त्यांनी सुनिल पाटील याचा फोन आल्याचे मान्य केले. त्यावरून ते आणखी अनेक गोष्टी मान्य करतील.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलाचे ड्रग्ज पेडलरबरोबर संबध असल्याचा गंभीर आरोप करत मलिक यांना खोटे आरोप करायची सवय लागली आहे. त्यामुळे ते सतत खोटे आरोप करत असल्याचा पलटवारही त्यांनी यावेळी केला.
माझा आणि ललित हॉटेलचा कोणताही संबध नाही. माझी या सरकारला विनंती आहे की, मागील पाच वर्षात ललित हॉटेल किंवा त्याच्या दोन किलोमीटरच्या परिसरात मी गेलोय का याचा तपास करावा आणि त्यासाठी तेथील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे अशी मागणी करत त्यांनी ललित हॉटेलचे नाव घेतले असल्याने आता त्या फुटेजचे टेम्परिंग केले जावू शकते अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
तसेच काशिफ खानने अस्लम शेख यांना पार्टीसाठी आमंत्रण दिले होते तर अस्लम शेख आणि काशिफ खान यांचे काय संबध आहेत? याची माहिती उघड झाली पाहिजे अशी मागणी करत कोण कोणाची ओळख असल्याशिवाय कोणाला जबरदस्ती करत नसल्याचे सांगत त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
मी ११०० कोटी रूपयांचा घोटाळा केला असे म्हणत असतील तर त्यांनी ते जाहीर करावं असे आव्हान मलिक यांना देत ते पुढे म्हणाले, मी निवडणूक लढविली त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात साडेतीनशे कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केलेले आहे. वरळीतील हॉटेलशी माझा काहीही संबध नाही. मी वर्षाला ५ कोटी रूपयांचा टॅक्स भरतो मी व्यापारी माणूस असून मी काहीच लवपित नसल्याचे स्पष्ट केले.
सुनिल पाटील, विजय पगारे यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केलंय. सुनिल पाटीलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने हे षडयंत्र आखले असून आता त्यांचे षडयंत्र उघड होत असल्यानेच ते नवनवे खोटे आरोप घेवून पुढे येत असल्याचा पलटवारही त्यांनी मलिक यांच्यावर करत त्यांनी ३५०० कोटी रूपयांची मालमत्ता कशी जमा केली याची माहिती द्यावी असेही आव्हानही त्यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या