भंगार व्यवसायिकला लुटणाऱ्या दोघांना अटक



रांजणगाव गणपती:- रांजणगाव औद्योगिक वसाहतीत पुठ्ठा खरेदी करण्याच्या बहाण्याने बोलऊन पाषाणमळा येथील भंगार व्यवसायिकाला लुटण्याचा प्रकार घडला असुन दरोडा टाकुन सुमारे ३ लाख २१ हजार किंमतीच्या मुद्देमाल लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुसक्या आवळल्या असुन दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे.

रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (दि २२) रोजी शिरुर येथील पाषाण मळा येथे राहणारा भंगार व्यवसायिक फिर्यादी रामनरेश रघुवीर निसाद याला एका अज्ञात व्यक्तीने पुठ्ठा खरेदी करण्याच्या बहाण्याने रांजणगाव औद्योगिक वसाहतीत बोलविले. त्यानंतर फिर्यादी हे त्यांच्या दोन कामगारांसह चार चाकी वाहनाने रांजणगाव एम आय डी सीत आले. त्यानंतर चार अनोळखी व्यक्ती दुचाकी वर तिथे आल्या. त्यानंतर त्या चार अनोळखी व्यक्तींनी रामनरेश निसाद आणि त्यांच्या दोन कामगारांना चारचाकी वाहनासह औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या ठिकाणी फिरवले आणि काही वेळाने त्या चार जणांनी त्यांना एका खाजगी एका कंपनी जवळील झाडीमध्ये जबरदस्तीने नेऊन मारहाण करत त्यांचे ३ मोबाईल व रोख ६ हजार रुपये काढुन घेतले. त्यानंतर फिर्यादीला त्याच्या मित्राला फोन करून ३ लाख रुपये घेऊन बोलविले. 

त्यानंतर त्या चार अनोळखी व्यक्तीनी त्यांच्या ५ व्या साथीदाराला बोलावुन घेतले. त्याने ते ३ लाख रुपये जबरदस्तीने फिर्यादी यांच्या कडुन हिसकून घेतले. या सर्व प्रकारानंतर रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनला मंगळवार (दि २३) रोजी रामनरेश निसाद यांच्या फिर्यादी वरुन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विश्लेषणाच्या आधारे संकेत शेजवळ याला शिरुर परिसरातून पोलीसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता दरोड्याचा हा गुन्हा संकेत शेजवळ, शाहरुख पठाण व त्यांच्या इतर तीन साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर शाहरुख पठाण याला ताब्यात घेऊन गुन्हात वापरलेली मोटार सायकल व रोख रक्कम ६५ हजार रुपये हस्तगत करून दोन्ही आरोपींना मुद्देमालासकट रांजणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या