मंत्री गडाखांचा राजीनामा घ्या अन्यथा सीबीआय चौकशीची मागणी करू : केशव उपाध्ये

 प्रतीक काळे आत्महत्या प्रकरण : भाजप आक्रमक 


मुंबई
 

मुळा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांचे स्वीय सहाय्यक प्रतीक काळे यांच्या आत्महत्येमुळे नेवासा तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता हे प्रकरण राज्य पातळीवर पोहचले असून प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ना. गडाख यांना मंत्रिपदावरून हटवावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पोलिसांनी गडाख परिवारातील तीन नवे का वगळली? असा प्रश्न उपस्थित करून गडाख मंत्रीपदी राहिल्यास निष्पक्ष तपास होणार नाही, असे मत व्यक्त केले. महाराष्ट्र पोलिसांनी याप्रकरणी योग्य तपास केला नाही, तर सीबीआय चौकशीची मागणी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. यावेळी माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, प्रदेश सचिव दिव्या ढोले, नगर जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, ऋषिकेश शेटे उपस्थित होते. गेल्या आठवड्यात प्रतीक काळेच्या आत्महत्येचे प्रकरण उघडकीस आल्यापासून नगर जिल्हा हादरला आहे. केवळ २७ वर्षांच्या या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह अनेकांची नावे घेऊन प्रतीक काळे याने मृत्यूपूर्वी तयार केलेला व्हिडिओ ही त्यांची मृत्यूपूर्व जबानी असल्याने त्या दिशेने तपास होणे गरजेचे असून शंकरराव गडाख हे सत्तेवर असल्याने तपासावर दबाव येऊ शकतो हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना पदावरून दूर करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

याआधीही ठाकरे मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या एका मंत्र्यास एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सरकारमधील मंत्र्यांची नावे येणे हा महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजीरवाणा प्रकार असून सत्तेच्या मस्तीपुढे मंत्र्यांनी नैतिकता गुंडाळून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा मंत्र्यांना पाठीशी घातले जात असल्याने अत्याचारात सहभागी असलेल्यांना सरकारचा आशीर्वाद असल्याची जनतेची भावना झाली आहे. बलात्कार प्रकरणी पीडितेने आरोप केल्यानंतरही सत्तारूढ पक्षाचा एक पदाधिकारी सरकारी पाठबळाच्या जोरावर उजळ माथ्याने फिरत असताना गडाख यांच्यावरही बंधूंच्या स्वीय सहायकास  आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होत असल्याने सरकारच्या नैतिकतेचे वाभाडे निघाले असल्याची टीका त्यांनी केली.

आत्महत्या करण्यापूर्वी प्रतिकने रात्री एका ठिकाणी मोटरसायकल थांबून ध्वनी तसेच चलचित्रफीत बनवून जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्यासह अनेकांची नावे घेत कोणी त्रास दिला, हे सांगितले. त्यांनी सहा दिवसापूर्वी नगर-औरंगाबाद रोडवरील वांबोरी फाट्याजवळील शेतामध्ये लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या प्रतीकची बहीण प्रतीक्षा काळे हिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रतीक नोकरीस असलेल्या मुळा संस्थेशी निगडित सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. व्यंकटेश नामदेव बेल्हेकर, विनायक दामोदर देशमुख, राहुल जनार्दन राजळे, महेश गोरक्षनाथ कदम, जगन्नाथ कल्याण औटी, रावसाहेब भीमराव शेळके, रितेश बबन टेमक अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व मुळा एज्युकेशन संस्थेशी निगडित आहेत. याच क्लिपमध्ये ना. गडाख यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनीता गडाख व बंधू विजय गडाख यांचाही नामोल्लेख आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात मात्र ही नावे वगळण्यात आली आहेत. त्यावरून तपास दबावाखाली होत असल्याचा संशय उपाध्ये यांनी व्यक्त केला. 

सहा वर्षे सेवेत असलेला आणि सख्या बंधूंकडे पीए म्हणून काम करणाऱ्या प्रतिकीकडे अशी कोणती माहिती होती? त्यासाठी मंत्री गडखानी त्याला टॉर्चर केले, याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्यमंत्री डोळे झाकून बसणार की गडाखांचे मंत्रिपद काढणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना संपर्क साधला असता, माहिती घेऊन बोलतो, असे म्हणून त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. 

गडाख निकटवर्तीय भयभीत 

 प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी यांनी गेल्यावर्षी दिवाळीच्या धामधुमीत आत्महत्या केली. ना. शंकरराव गडाख यांचे नेवासा शहरातील विरोधक संजय सुखदान यांनी सोशल मीडियात आत्महत्येचा इशारा देत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले. पीए प्रतीक काळेने आत्महत्या केली. त्यानंतर प्रशांत गडाख यांचे कार्यकर्ते, हिंतचिंतक, मित्र परिवार, मुळा संस्थेतील त्यांचे निकटवर्तीय चांगलेच भयभीत झाल्याचे चित्र आहे. या आत्महत्येप्रकरणी मुळा शिक्षण संस्थेतील काही नेत्यांसह कर्मचार्‍यांची चौकशी होणार आहे.  

मी दोषी आढळलो तर फासावर लटकवा : ना. गडाख 

प्रतीक माझा पीए नव्हता. माझा भाऊ कामकाज पाहत असलेल्या यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेजचा कर्मचारी होता. प्रशांत सहा महिन्यापासून आजारी आहे, मृत्यूशी झुंज देतो आहे. दरम्यान प्रतीक कॉलेजमध्ये काम करताना काही तक्रारी झाल्या आणि ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी काहींना अटकही केली आहे. या घटनेचे काही लोक राजकारण करू पाहत आहेत. त्यांनी सखोल चौकशी करावी. राजीनामाच काय मी दोषी आढळलो तर राजीनामाच काय फासावर लटकवा, असे आव्हान ना. गडाख यांनी विरोधकांना दिले. दरम्यान प्रतीकची बहीण फिर्यादी प्रतीक्षा काळे यांनीही या घटनेशी ना. गडाख यांचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या