मुंबई कसोटीपूर्वी भारताला मोठा धक्का, 3 दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त




मुंबई : येथील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला तीन मोठे धक्के बसले आहेत. संघाचे तीन दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडले आहेत. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा या तीन खेळाडूंना दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने सांगितले की, इशांत शर्माच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याचवेळी जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या डाव्या पायांचे स्नायू दुखावले आहेत. 

इशांत बाहेर पडल्याने मोहम्मद सिराजचा संघात प्रवेश निश्चित समजला जात आहे. त्याचबरोबर टीम इंडियाची आणखी एक समस्याही दूर झाली आहे. कोहलीच्या पुनरागमनानंतर संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत बराच संभ्रम निर्माण झाला होता. विराटसाठी प्लेईंग-11 मधून कोणाला वगळावे, असा प्रश्न संघ व्यवस्थापनाला सतावत होता. कारण पहिल्या सामन्यात कोहलीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या श्रेयस अय्यरने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून इतिहास रचला. रहाणे दुखापतीमुळे बाहेर पडल्याने ही अडचण संपली आहे. रवींद्र जडेजाच्या जागी संघ कोणाला संधी देतो हे पाहावे लागेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या