विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम

समाज कल्याण आयुक्तांनी घेतला नियोजनाचा आढावा 



पुणे :
 हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी आढावा घेतला आणि  विजयस्तंभ परिसरास भेट देऊन केली पाहणी केली. 

यावेळी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, विजयस्तंभ स्मारक समितीचे पदधिकारी उपस्थित होते. 

देशभरातील अनुयायी १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच कार्यक्रम शांततेत व्हावा यासाठी शासनाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येत असल्याचे आयुक्त डॉ.नारनवरे यांनी सांगितले.
वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ आणि गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधी स्थळासदेखील भेट देऊन आयुक्त नारनवरे यांनी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. 
विजयस्तंभ परिसरात मूलभूत सोयी सुविधा, सुशोभिकरण व अन्य विकासाची तसेच शौर्य दिन व अन्य अल्पकालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन व नियोजन यापुढे सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणार असल्याबाबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच घोषणा केली आहे. त्यानुसार विजयस्तंभ व परिसराच्या विकास व सुशोभीकरण कामाचा 100 कोटींचा बृहत विकास आराखडा तयार करण्यासाठी समितीही गठीत करण्यात आली. तसेच एक जानेवारीच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठीही एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या