बीएसएनएलमधील साडेअकरा लाखांच्या वायरची चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक


लोणी काळभोर : 


कदमवाकवस्ती (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बी.एस.एन.एल.)  या कंपनीची सुमारे ११ लाख ५३ हजार ९३० रुपयांची दीड हजार मीटर तांब्याची वायर चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची तांब्याची वायर हस्तगत करण्यात आली आहे.  

मौला शब्बीर शेख (वय -४२, रा. घोरपडेवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली मुळ गाव, वाधी बोबळी, ता. जिंतूर)  असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अभिजित अरविंद खडके (वय-३४ रा. हडपसर) यांनी अज्ञात चोरट्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत उघड्यावर असलेली बी.एस.एन.एल. कंपनीची तांब्याची वायर ०१ जुलै ते २० डिसेंबर या कालावधीत कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याचा गुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

 या गुन्ह्याचा तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी आणि  पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस हवालदार संतोष होले यांनी करण्यास सुरुवात केली होती. तपास करीत असताना हवालदार संतोष होले यांना  सदरचा गुन्हा हा मौला शेख व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची पक्की माहिती मिळाली.

दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिस हवालदार संतोष होले यांनी आरोपीला ताब्यात घेऊन  चौकशी केली असता, आरोपी मौला शेख याने  त्याच्या साथीदारांबरोबर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या