हॉकीच्या मैदानात भारताने पाकिस्तानला लोळवलं



 बांगलादेशात ढाका येथे सुरु असलेल्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत  भारताच्या पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजयाची नोंद केली आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात हरमनप्रीत सिंगआणि आकाशदीप सिं यांच्या गोलच्या बळावर भारताने पाकिस्तानवर ३-१ ने विजय मिळवला.

या स्पर्धेत तीन सामन्यातील सात गुणांसह भारतीय हॉकी संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. याआधी झालेल्या दोन सामन्यात भारताची दक्षिण कोरिया विरुद्धची लढत २-२ अशी बरोबरीत सुटली होती. त्यानंतर भारताने बांगलादेशवर ९-० अशी एकतर्फी विजयाची नोंद केली होती. टोक्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताने कास्यपदक विजेती कामगिरी केली होती.

जागतिक क्रमवारीत भारतीय हॉकी संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पहिल्या सत्राच्या खेळात भारताने वर्चस्व गाजवले. सामन्याच्या आठव्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीतने थेट चेंडूला गोलपोस्टची दिशा दाखवत भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या सत्राच्या खेळात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत परस्परांवर हल्ले चढवले. पण यश कोणालाही मिळाले नाही. तिसऱ्या सत्रात अखेरच्या काही मिनिटांमध्ये भारतीय संघाने आक्रमक चाली करत पाकिस्तानवर दबाव वाढवला. सुमीत कुमारकडून मिळालेल्या सुंदर पासवर आकाशदीप सिंगने चेंडू गोलपोस्टमध्ये पाठवून आघाडी २-० ने वाढवली. पण त्यानंतर पाकिस्तानने सुद्धा एक गोल केला. सामना संपायला सात मिनिटे बाकी असताना भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीत सिंगने कुठलीही चूक न करताना चेंडूला गोलपोस्टमध्ये पाठवून भारताची आघाडी ३-१ ने वाढवली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या