Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला यश आल्याने घंटानाद स्थगित


भोर :

       नगरपालिकेस नगर विकास खात्यामार्फत मंजूर झालेला दीड कोटी रुपयांचा विकास निधी शहरातील विकास कामांसाठी वापरण्यास चालढकल करणाऱ्या पालिका प्रशासनाने विकास निधी मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत पाठवणार असल्याचे पत्र मुख्याधिकारी हेमंत कीरुळकर यांनी दिल्याने आज (दि.२१) रोजी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने पालिका प्रांगणात केले जाणारे घंटानाद आंदोलन स्थगित केल्याचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी सांगितले.

       शहर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने  राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते विजयभाई रावळ,जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे,तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांच्या नेतृत्वात सातत्याने शहरातील विकासकामांबाबत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. नगर विकास खात्यामार्फत खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे आलेला दीड कोटी रुपयांचा विकास निधी शहरातील विकास कामांसाठी खर्च करण्याबाबत वारंवार निवेदन (दि.६ डिसें. व २०डिसें) देऊन विचारणा केली.मात्र निवेदन देऊनही पालिका प्रशासन जुमानत नसल्याने आज (दि.२१) रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येणार होते मात्र मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी विकासनिधी सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे पत्र दिल्याने घंटानाद आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे माजी नगराध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. 

 याप्रसंगी उद्योजक यशवंत डाळ,शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नितीन धारणे,जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष, सुहित जाधव, कुणाल धुमाळ,महिलाध्यक्षा हसीना शेख,एकनाथ रोमण,जाकीर भालदार, सुरेश वालगुडे,राजेंद्र शिंदे,बाळासाहेब खुटवड,चेतन जाधव,व्हीजेएनटी सेलचे विक्रम शिंदे,अतिश वाडकर,राम घोणे,पोपट तारू उपस्थित होते.

No comments