धार्मिक वैभव वाढीसाठी भक्ती व शक्तीच्या माध्यमातून प्रयत्न करा : गुरुवर्य भास्करगिरी महाराज


नेवासा  (प्रतिनिधी) 

नेवासा बुद्रुक येथील श्री खंडोबारायांच्या सासुरवाडीची महती जगभर पोहचविण्यासाठी शक्ती व भक्तीच्या माध्यमातून प्रयत्न करा. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन एकोप्याने काम करा असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी यावेळी बोलतांना केले.

नेवासा बुद्रुक येथील म्हाळसादेवी खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी महोत्सव उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून म्हाळसादेवी खंडोबा मंदिरात भगवान दत्तात्रयांसह गणपतीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या  हस्ते करण्यात आली. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य आचार्य गणेशगुरू देवा कुलकर्णी व मुळे यांच्यासह ब्रम्हवृंद मंडळींनी केले.

यावेळी झालेल्या होमहवन व नवग्रह पूजन विधी नंतर

यजमानांच्या उपस्थितीत हभप गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते होम कुंडात श्रीफळ अर्पण करून पूर्णाहुती देण्यात आली. पारायण मंडपात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी बाबा यांच्या समवेत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,नारायण महाराज ससे,जेष्ठ मार्गदर्शक तुकारामजी नवले,देवगडचे संतसेवक सीताराम जाधव,माजी सरपंच दादासाहेब कोकणे,अजित जाधव जीर्णोद्धार न्यास समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.मुरलीधर कराळे, पुनतगाव येथील गोसावी बाबा यावेळी उपस्थित होते.

यावेळी डॉ.मुरलीधर कराळे यांनी उपस्थित संत महंत व प्रमुखांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. गुरुवर्य भास्करगिरी बाबासह इतर संत महंतांचे मार्गदर्शन व आशिर्वाद व भक्त व ग्रामस्थांच्या मिळालेल्या पाठबळामुळे या मंदिराची उभारणी झाली असून उर्वरित भक्त निवास व इतर कामे करण्यासाठी निधी उपलब्ध झाल्याने ती कामे ही लवकरच मार्गी लागतील असे सांगितले.

यावेळी बोलतांना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की खंडोबारायाची मोठमोठे क्षेत्र देशात आहे परंतु खंडोबारायाची सासुरवाडी ही या स्थानाची ओळख आहे,शक्ती व भक्तीच्या माध्यमातून या स्थानाची उभारणी झाली आहे या पवित्र क्षेत्राच्या वैभवात भर घालणारे हे क्षेत्र आहे,उपासनेच्या माध्यमातून अंतकरण पवित्र करा सर्वांचे हित जपण्यासाठी मानवता धर्म जपण्याचा प्रयत्न करा सर्वांना बरोबर घेऊन धार्मिकता

रुजविण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मंदिर विश्वस्त सर्जेराव चव्हाण यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या