पिकांमध्ये सापांचा संचार वाढला शेतकऱ्यांनो सावध रहा !

रांजणगाव गणपती:- 


 पुणे जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपुर्वी मोठया प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. तसेच अजुनही पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सापांच्या अधिवासात पाणी शिरत असून सापांना खाद्य मिळणे कठीण असल्याने आजूबाजूच्या शेतात तसेच पिकांत सापांचा संचार वाढत आहे. तसेच अनेक शेतात साप आढळू लागल्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे आवाहन सर्पमित्र आणि वन्यजीव प्रेमींकडून शेतकरी व नागरिकांना केले जात आहे.

सध्या अवकाळी पाऊस पडल्याने पावसाच्या पाण्यामुळे मानवी वस्तीसह आजूबाजूंच्या परिसरात व शेतात सापांचा संचार वाढतो. तसेच सापांच्या बिळात पावसामुळे गोळा झालेले पाणी शिरते. त्यामुळे भक्ष्य शोधण्यासाठी आणि लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप मानवी वस्ती तसेच शेतातील पिकात वावरत असतात. मात्र भारतात आढळणाऱ्या ५२ विषारी सापांपैकी पुणे जिल्ह्यात केवळ सहा जातीचे विषारी साप आढळत असून त्यामध्ये नाग, मण्यार, घोणस, फुरसे, चापडा तसेच पोवळा हे सहा साप आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतातील ऊस तोडणी चालू असताना ऊसतोड कामगारांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 

तसेच सध्या घोणस सापांचा मिलनकाळ असल्याने अनेक ठिकाणी दोन, तीन, चार असे घोणस साप एकाच वेळी निदर्शनास येत आहेत. पावसामुळे बिळात पाणी शिरल्याने सापांचा जमिनीवर तसेच शेतात मोठ्या प्रमाणात संचार वाढतो. प्रामुख्याने उंच वाढलेल्या पिकांत खाद्य शोधण्यासाठी साप फिरतात, सापाला ऐकू येत नाही परंतु साप जमिनीवरुन तो अंदाज लावतो. त्यामुळे पाय आदळत फिरल्या साप असल्याचे कळू शकते. शेतकऱ्यांनी सहसा लांब बूट घालूनच पिकात फवारणी किंवा पाहणी करावी आणि शेतामध्ये काम करताना योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन देखील पुणे जिल्ह्यातील सर्प अभ्यासक सर्पमित्र अमर गोडांबे, शेरखान शेख व श्रीकांत भाडळे यांनी नागरिक व शेतकऱ्यांना केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या