Breaking News

हॉस्पिटल परिसरात 12 कवट्या अन् 54 हाडं

 गर्भपात प्रकरण :आर्वी हॉस्पिटलच्या डॉ. कदमला अटक


वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गर्भपात प्रकरणात कदम हॉस्पिटलचे डॉ. नीरज कदम यांना अखेर अटक करण्यात आली. याच दरम्यान पोलिसांना त्याच चेंबरमध्ये 12 कवट्या अन् 54 हाडं आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी डॉ. रेखा कदम यांना सहकार्य करणाऱ्या दोन परिचारिकांनाही अटक केली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. डॉ. कदम यांना अद्याप अटक करण्यात अली नव्हती. मात्र आता पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवला असून डॉ. कदम यांना अटक केली आहे. आर्वी गर्भपात प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता सहावर पोहोचली आहे. 15 जानेवारी रोजी रात्री उशिरा डॉ. कदम यांना तब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे या गर्भपात प्रकरणात रोजच नवनवे खुलासे होत आहेत. आर्वी येथील कदम हॉस्पिटलमध्ये बुधवारी म्हणजेच 12 जानेवारी रोजी बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचे समोर आले होते.

रेखा कदम यांची पोलीस कोठडीत चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी आतापर्यंत दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी 12 जानेवारी रोजी रुग्णालय परिसरातील बायोगॅस चेंबरमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताचे भ्रुण शोधण्यासाठी तपासणी केली. याच दरम्यान पोलिसांना त्याच चेंबरमध्ये 12 कवट्या अन् 54 हाडं आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी डॉ. रेखा कदम यांना सहकार्य करणाऱ्या दोन परिचारिकांनाही अटक केली आहे. शनिवारी मध्यरात्री 1 वाजून 45 मिनिटांनी या प्रकरणात डॉक्टर नीरज कदम यांनासुद्धा पोलिसांनी अटक केली. कदम रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्रा हे डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम यांच्या नावाने आहे.

याच कदम रुग्णालयाच्या गर्भपात केंद्राचा परवाना हा डॉ. शैलेजा कदम यांच्या नावे असल्याने त्यांनाही चौकशीसाठी सूचनापत्र पोलिसांनी बुधवारी दिले होते. मात्र, या दरम्यान शैलेजा कदम यांची प्रकृती खालावली. शुक्रवारी त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णायलात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती आहे. शनिवारी सकाळपासूनच कदम रुग्णालय परिसरात डॉ. नीरज कदम यांना सोबत घेत आर्वी पोलिसांसह आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी केली. याच दरम्यान पोलिसांना कदम यांच्या घरात काळविटीची कातडी आढळली. तर आरोग्य विभागाच्या पथकला काही औषधी आणि इंजेक्शनसुद्धा मिळाले असून ते आरोग्य विभागाने जप्त केले आहे. दिवसभर चाललेल्या तपासणीनंतर आर्वी पोलिसांनी डॉ. नीरज कदम यांना मध्यरात्री बेड्या ठोकल्या. त्यामुळे आता याप्रकरणात आरोपी संख्या सहावर पोहचली आहे.

डॉ. कदम रुग्णालयात असलेल्या गर्भपात केंद्राचा परवाना हा डॉ. शैलेजा कदम यांच्या नावावर होता. डॉक्टर शैलजा कदम या रेखा कदम यांच्या सासू आहेत. तर सोनेग्राफी सेंटरचा परवाना डॉ. रेखा आणि डॉ. नीरज कदम यांच्या नावे होता. विशेष म्हणजे या सोनोग्राफी केंद्राच्या परवान्याची मुदत 19 डिसेंबर 2021 मध्येच संपली होती. परवाना नुतनीकरणासाठी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे प्रस्ताव पाठविला असून परवाना नुतनीकरण प्रक्रियेत आहे. मात्र, गर्भपाताचा कुठलाही परवाना नसताना डॉ. रेखा कदम यांनी गर्भपात केला कसा, हा प्रश्न निर्माण होतो आहे.
-------
अगोदर डॉ. रेखा कदम यांच्यासह 5 जणांना अटक

आर्वी शहरात असलेल्या कदम रुग्णालयात गर्भपात केंद्र आणि सोनोग्राफी सेंटर आहे. गर्भपात केंद्र हे डॉ. रेखा कदम यांच्या सासू डॉ. शैलेजा कदम यांच्या नावावर आहे. तर सोनोग्राफी सेंटर हे डॉ. रेखा कदम आणि डॉ.नीरज कदम या दोघांच्या नावाने आहे. या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला होता. हा प्रकार उघडीस आल्यानंतर मुलीच्या आई व वडिलांसह गर्भपात करणाऱ्या डॉ. रेखा कदम आणि 2 परिचारिका अशा एकूण 5 जणांना पोलिसांनी अटक केली होती. आता याच प्रकरणात मध्यरात्री डॉ. नीरज कदम यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.
--------

No comments