डोक्यात हातोडा घालून पतीची हत्या करणाऱ्या महिलेला अटक करुन काही वेळातच पोलिसांनी सोडून दिलं; कारण…



राहत्या घरात पतीच्या डोक्यात हातोड्याने वार करुन तिने हत्या केली. यानंतर तिनेच आरडाओरड करुन शेजाऱ्यांना गोळा केलं.

या महिलेले अटक करण्यात आली नंतर तिची सुटका केली गेली (प्रातिनिधिक फोटो)

एका महिलेने आपल्या पतीच्या डोक्यामध्ये हातोड्याने वार करुन त्याची हत्या केली. त्यानंतर याच महिलेने आरडाओरड करुन शेजाऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या महिलेला ताब्यात घेतलं. मात्र काही वेळेतच पोलिसांनी या महिलेला सोडून दिलं. एखाद्या मालिकेमधील कथनाक वाटावं अशी ही घटना खरोखरच घडलीय तामिळनाडूमध्ये. तामिळनाडू पोलिसांनी या आगळ्या वेगळ्या प्रकरणामध्ये महिलेविरोधात कलम १०० अंतर्गत गुन्हा दाखल करुन घेत तिची मुक्तता केलीय. कलम १०० हे आत्मसंरक्षणाचं कलम आहे. भारतीय दंड संहितेमधील शंभराव्या कलमानुसार एखाद्या व्यक्तीला शारीरिक हानी पोहवण्याची शक्यता निर्माण झाल्यास त्या व्यक्तीला आत्मरक्षा करण्याचा अधिकार असतो.


पोलीस तपासामध्ये महिलेने स्वत:च्या संरक्षणासाठी आपल्या पतीची हत्या केल्याची माहिती समोर आली. त्यामुळेच महिलेला अटक झाल्यानंतर काही वेळातच सोडून देण्यात आलं. ही महिला तिच्या २० वर्षीय मुलीसहीत आपल्या पतीसोबत राहत होती. ही घटना घडली तेव्हा या महिलेचा पती नशेच्या अवस्थेत होता. अनेकदा तो दारु पिऊन यायचा आणि पत्नीला मारहाण करायचा. दारुसाठी तो नेहमी पत्नीकडे पैशांची मागणी करायचा. पैसे नाही मिळाले की तो पत्नीला बेदम मारहाण करायचा आणि मोठमोठ्याने शिवीगाळ करायचा.

एससी-एसटी पदोन्नती आरक्षणासाठी मापदंड निश्चितीस नकार; सर्वोच्च न्यायालयाची भूमिका

गुरुवारी रात्री दारुच्या नशेत या महिलेचा पती घरी पोहचला. त्यानंतर त्याने आपल्या २० वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या महिलेने पतीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्यावर हल्ला केला. आपल्या आणि आपल्या मुलीच्या संरक्षणादरम्यान नवऱ्याशी झालेल्या झटापटीदरम्यान या महिलेने त्याच्या डोक्यात हातोड्याने वार केला. या हल्ल्यामध्ये डोक्यावर हातोडा लागल्याने दारुड्या पतीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर महिलेने आरडाओरड करुन शेजाऱ्यांना बोलवलं. शेजाऱ्यांनी समोरचा सारा प्रकार पाहून थेट पोलिसांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.


या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याने पोलिसांनी या महिलेला आणि तिच्या मुलीला अटक केली. दोघींकडेही चौकशी केल्यानंतर या महिलेने पतीची हत्या स्वत:चा आणि मुलीचा जीव वाचवण्यासाठी केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी या प्रकरणामध्ये सर्व बाजू आणि परिस्थिती समजून घेत महिलेविरोधात आधी ३०२ कलम म्हणजेच हत्येच्या गुन्ह्याखाली तक्रार दाखल करुन घेतली. मात्र नंतर पोलिसांनीच कलम ३०२ हटवून कलम १०० अंतर्गत गुन्हा दाखल करुन घेतला. या प्रकरणामध्ये महिलेला अटक होणार नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं असून न्यायालयाकडे यासंदर्भातील अहवाल सादर केलाय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या