Breaking News

बातमी दिल्याच्या रागातुन पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी

 

 शिक्षण संस्थाचालकाविरूद्ध गुन्हा 

तळेगाव ढमढेरे : पाबळ येथील गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांची कौतुकाची बातमी मला विचारून का केली नाही तसेच बातमीत विशिष्ट नावे का टाकली याचा राग मनात धरून पत्रकारास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
    याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिक्रापूर व पाबळ या गावासाठी सी चोवीस तास वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून काम करत असलेले सुनिल दत्तात्रय पिंगळे यांनी पाबळ येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत आल्याबद्दल बातमी केली होती. ही बातमी विद्यार्थ्यांच्या कौतुकाची तसेच संस्थेच्या अभिमानाची असताना देखील ही बातमी मला विचारून का केली नाही तसेच बातमीत विशिष्ट नावे का टाकली याचा राग मनात धरून पाबळ(ता.शिरूर) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांनी फोनवर जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सुनील दत्तात्रय पिंगळे (रा.पाबळ,ता.शिरूर,जि.पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी संबंधित इसम भगवान घोडेकर यांना शिक्रापूर पोलिस ठाण्यात बोलावुन चौकशी केली असता व पत्रकार सुनिल पिंगळे यांनी आँडिओ रेकॉर्डिंग व यामागील घोडेकर यांची असलेले पार्श्वभूमी व त्यासंदर्भातील वस्तुनिष्ठ पुरवे सादर केल्यानंतर  संबंधित इसम भगवान घोडेकर यांनी पत्रकार सुनिल पिंगळे यांना जीवे मारण्याची धमकी दिले असल्याचे निष्पन्न झाले. त्या अंतर्गत धमकी देणे, निराधार आरोप करणे असे घोडेकर यांच्याकडुन घडले असुन त्याअंतर्गत भगवान दगडू घोडेकर (वय 58 रा.पाबळ ता. शिरूर, जि.पुणे) यांचे विरुद्ध शिक्रापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे, तालुकाध्यक्ष जालिंदर आदक यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत संस्थाचालक भगवान घोडेकर यांच्यावर कारवाई करण्याविषयी निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सदर घटनेची गंभीरता लक्षात घेता भगवान घोडेकर यांच्यावर काल जिवे मारण्याची धमकी देणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम सांळुके करत आहेत.

स्वतंत्र चौकट-:
*संबंधितांवर कठोर कारवाई करा*
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन परिसरातील चांगल्या वाईट घडामोडींचे वार्तांकन करत असतो. त्यामुळे बातमी दिल्याच्या रागातुन पत्रकारांस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे हा प्रकार अतिशय निंदनीय असुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने शिक्रापूर पोलिसांना देण्यात आले आहे.यावर शिक्रापूर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे काय कारवाई करतात याकडे जिल्ह्यातील पत्रकारांचे लक्ष लागुन आहे. 

No comments