तीन लाखांच्या बदल्यात बळकावली ३५ लाखांची जमीन


श्रीरामपूरच्या सावकाराविरुद्ध राहाता येथे गुन्हा दाखल 

राहाता : पत्नीच्या किडनी शस्त्रक्रियेसाठी शेतकऱ्याने सावकाराकडून घेतलेल्या तीन लाख रुपयांच्या बदल्यात ३५ लाखांची जमीन बळकावल्याप्रकरणी श्रीरामपूरच्या सावकाराविरुद्ध राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नांदुर (ता.राहाता) येथील शेतकरी शैलेश गायकवाड याने फिर्याद दिली असून भारत हुसेन लोखंडे (रा. श्रीरामपूर) असे आहे. 
लोखंडे याने दिलेल्या पैशाच्या बदल्यात बळजबरीने गायकवाड यांच्या शेत जमिनीचे खरेदीखत केले. सदर एक एकर शेतजमीन परत घेण्यासाठी गायकवाड यांनी सावकारास मुद्दल व व्याजमिळून 6 लाख 60 हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली असतानाही सावकार शेतकऱ्यास जमीन देण्‍यास नकार देत होता. 
याप्रकरणी शैलेश माधवराव गायकवाड (वय 42) यांनी राहाता पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार 2020 मध्ये पत्नी शोभा हिचे किडनीचे ऑपरेशन करायचे असल्याने त्यांना पैशाची गरज होती. त्यादरम्यानचे काळात व्याजाने पैसे देणारा व माझ्या ओळखीचे असलेले श्रीरामपूर येथील वार्ड नंबर 2 मध्ये राहणारे भारत हुसेन लोखंडे याची व माझी नांदूर येथे भेट झाली. त्यावेळी मी लोखंडे यास दवाखान्याबाबतची अडचण सांगून मला 3 लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. त्यावर लोखंडे याने मी तुला 3 लाख रुपये १० टक्के व्याजाने देतो असे सांगून सदर व्यवहाराची गॅरंटी म्हणून तुझ्याकडील एक एकर जमिनीचे खरेदीखत करून द्यावे लागेल असे मला सांगितले. 
त्यावेळी मला पत्नीच्या उपचारासाठी पैशांची आवश्यकता होती व माझा नाईलाज असल्याने मला लोखंडे म्हणतो तसे करणे भाग होते. मी त्यास व्याजाने घेतलेली रक्कम व त्यावरील व्याज परत दिल्यानंतर लगेच तात्काळ माझी जमीन पुन्हा माझ्या नावावर करून द्यावी लागेल असे सांगितले होते. त्यास लोखंडे याने होकार दिला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. 
ठरल्याप्रमाणे दि. 14 डिसेंबर 2020 रोजी भारत हुसेन लोखंडे याने मला राहाता येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बोलावून घेतले. माझ्या नावे 3 लाख रुपयांचा चेक लिहून चेक वरील रक्कम बँकेतून काढून त्यातील 50 हजार रुपये खरेदीच्या कागदपत्रांचा खर्च म्हणून माझे कडून काढून घेतले व 2 लाख 50 हजार रुपये मला दिले व तेथेच मला धमकावून माझ्या नावावरील नांदूर शिवारातील गट नंबर 101 मधील सामाईक क्षेत्रापैकी 40 गुंठे अर्थात एक एकर जमीनीची खरेदी करून घेतली. त्यानंतर मी लोखंडे यास काही दिवसानंतर त्याच्याकडून घेतलेल्या रकमेच्या व्याजापोटी ३० हजार रुपये दिले. माझी अडचण दूर झाल्यानंतर मी सावकार लोखंडे यास त्याने दिलेली 3 लाख रुपये व ठरल्याप्रमाणे व्याजाची रक्कम 3 लाख 60 हजार रुपये असे मिळून एकूण 6 लाख 60 हजार रुपये रक्कम देत होतो. तेव्हा लोखंडे यांनी सदरची रक्कम घेतली नाही. उलट मला दमदाटी व शिवीगाळ करून तुझ्याकडून मी जमीन विकत घेतलेली आहे. त्यामुळे मी तुला तुझी जमीन परत देणार नाही. तुला काय करायचे ते करून घे, असे म्हणाला. मी बराच वेळा लोखंडे यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला व माझी जमीन परत माझ्या नावावर करून देणे बबत तगादा लावला परंतु लोखंडे हा माझी जमीन माझे नावावर करून देत नाही. 35 लाख रुपये किंमतीची जमीन लोखंडे याने फक्त तीन लाख रुपयांमध्ये बळकावली आहे. माझी जमीन परत मागितली असता त्याने मला शिवीगाळ दमदाटी केली. त्याचप्रमाणे यापूर्वी वेळोवेळी मला लोखंडे याने व्याजाची रक्कम मागताना फोनवरून उद्धट बोलून दमदाटी केली आहे त्याचे रेकॉर्डिंग ची क्लिप असल्याचे सांगत शैलेश गायकवाड यांनी लोखंडे यांचे विरोधात जमीन बळकावल्या प्रकरणी राहाता पोलिसात फिर्याद दाखल केली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 
गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी भारत हुसेन लोखंडे (रा श्रीरामपूर) याच्या विरोधात भादवी कलम 392,504,506,507 सह सावकारी कायदा कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे हे करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या