कोपरगावात दोन बसवर दगडफेक; चालक जखमी

 नगर : शरद पवारांच्या आवाहनानंतरही एसटी कामहारांचे आंदोलन सुरूच असून राज्य परिवहन महामंड


ळाच्या दोन बसेसवर कोपरगाव येथे दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. श्रीरामपूर व वैजापूरकडे जाणाऱ्या दोन्ही बसेसच्या समोरील काचांवर ही दगडफेक करण्यात आली असून हल्लेखोर पसार झाले आहेत. वैजापूरकडे जाणाऱ्या बसमधील चालकाच्या डोळ्यात काचा उडाल्याने ते जखमी झाले. बसमधील प्रवाशी सुरक्षित आहेत मात्र ते प्रचंड भयभीत झाले. यापूर्वी नेवासे व संगमनेर येथेही बसवर दगडफेक झाली होती. 


गेल्या दोन महिन्यांपासून राज्य शासनात एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांचा संप सुरू आहे. सरकारने वारंवार संप मागे घेण्याचे आवाहन करूनही कामगार मात्र आंदोलनावर ठाम आहेत. काही कामगारांचे निलंबन तर काहींना बडतर्फ करण्यात आले असून काही आगारांमधील कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आवाहन केल्यानंतर अनेक संघटनांनी संपातून माघार घेतली आहे, तर काही संघटना अद्यापही संपावर ठाम आहेत. अनेक आगारातून कमी अधिक प्रमाणात बससेवा सुरू झाली असली तरी एसटी बसवर हल्ले होत असल्याच्या घटना देखील घडत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव आगाराची बस क्रमांक एम एच १३ सीयू ८४८९ ही बस आरटीओ कामासाठी कोपरगावहून श्रीरामपूरकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र दोन किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाजवळ अज्ञाताने बसवर दगडफेक करून काच फोडली असून हल्लेखोर बाजूच्या ऊस शेतीतून पसार झाले आहेत. चालक सानप आणि वाहक गरकल यांनी या घटनेची माहिती तातडीने आगार प्रमुख अभिजित चौधरी यांना दिली.


दुसऱ्या घटनेत एम एच १४ बिटी २४६० वैजापूर-कोपरगाव ही एसटी बस दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान कोपरगाव बस स्थानकातून वैजापूरला जाण्यासाठी मार्गस्थ झाली. मात्र एक किलोमीटर अंतरावर कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नरच्या पुढे गेल्यानंतर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञान इसमांनी बसवर दगडफेक केली. यावेळी बसमध्ये चालक एस. एस गायकवाड आणि वाहक एस. के. भागवत तसेच १३ प्रवासी प्रवास करत होते. दगडफेकीमुळे काचा बसच्या आत पडल्याने प्रवासी घाबरून गेले आणि त्यांनी आरडा-ओरड सुरू केली. बसवर दगडफेक करून दोन्ही हल्लेखोर पसार झाले आहेत. या हल्ल्यात प्रवासी सुखरूप असून चालकाच्या डोळ्यात काचेचे बारीक तुकडे गेल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे. 
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तातडीने आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते. मात्र या घटनेने कोपरगावसह अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या