“जोवर हिंदू-मुस्लीम वाद पेटत नाही तोवर…”; टिपू सुलतान प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांचा भाजपावर गंभीर आरोप


मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या वादाने राजकीय वातावरण तापले आहे.

मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा वाद संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. बुधवारी क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन मालाडमध्ये भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या सगळ्या प्रकाराबद्दल वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

हा हिंदू मुस्लीम वाद पेटवण्यासाठीचा मुद्दा असल्याचं सांगत डॉ. आंबेडकर म्हणाले, “टिपू सुलतान हा फार महत्वाचा मुद्दा आहे अस मी मानत नाही. आर.एस.एस आणि भाजपाला अँटी मुस्लीम लाट निर्माण करणं हे जिंकण्याचं साधन आहे असं ते मानतात. हळू हळू आपला जनाधार कमी होतोय का या भीतीपोटी त्यांनी आता अँटी मुस्लीम भूमिका घ्यायची सुरूवात केली आहे. मुंबईतही त्यांनी टीपू सुलतानचं नाव देण्यावरून वाद उपस्थित केला आहे. दंगल होईल अशी परिस्थिती आहे. जोवर हिंदू मुस्लीम वाद पेटत नाही, तोवर शासन आपल्या हातात येईल असं त्यांना वाटत नाही. म्हणून उद्याच्या कालावधीत ही परिस्थिती बदलेल असं मला वाटतं”.

काय आहे हे प्रकरण?

मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या वादाने राजकीय वातावरण तापले आहे. बुधवारी क्रीडा संकुलाच्या उद्धाटनाआधी भाजपा, बजरंग दलाने नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार अतुल भातखळकर आंदोलनासाठी उपस्थित होते. पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन केले आहे. यावरून आता भाजपा आक्रमक झाली असून महाराष्ट्रभर यासंदर्भात आंदोलनचे लोण पसरण्याचा इशारा भाजपाने दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या