धरणांमध्ये सध्या ८२.३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी अधिक


पुणे, प्रतिनिधी- हंगामातील पावसाचा लांबलेला कालावधी आणि पूर्वमोसमी, अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले, तरी राज्यातील धरणांमध्ये सध्याही मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.राज्यातील छोट्या-मोठ्या सर्वच धरणांमध्ये सध्या ८२.३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, गतवर्षीच्या तुलनेत तो आठ टक्क्यांनी अधिक आहे.

जून ते सप्टेंबर हा हंगामी पावसाचा कालावधी समजला जातो. या काळात मोसमी वाऱ्यामुळे हक्काचा पाऊस मिळतो. मार्च ते मे या दरम्यान होणारा पाऊस पूर्वमोसमी, तर मार्चच्या आधी होणारा पाऊस अवकाळी पाऊस म्हणून ओळखला जातो. यंदा पावसाच्या मूळ हंगामातील पाऊस सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरपर्यंत लांबला. ऑक्टोबर महिन्यातही राज्यात बहुतांश भागात मोसमी वाऱ्याच्या प्रभावामुळे पाऊस झाला. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरसह नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जानेवारीतही विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्र विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मार्च, एप्रिल आणि मे या पूर्वमोसमीच्या कालावधीत मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसात मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, या पावासामुळे धरणसाठ्यांमध्ये मोठी भर पडली.

यंदा पाणीसाठा टिकून राहण्यात हंगामापेक्षा पूर्वमोसमी आणि अवकाळी पावसाचा वाटा मोठा असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या कारणांमुळे जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणात अधिक पाणी शिल्लक राहिले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या