Breaking News

अवकाळी पावसासह गारपिटीचा विदर्भाला फटका

 

शेतीपिकांचे नुकसान; महाराष्ट्रात थंडीची लाट 

नागपूर : हवामान खात्याचा इशारा खरा ठरवत गेल्या तीन-चार दिवसांपासून उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाने ठाण मांडले. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एखाद्या लिंबाच्या आकाराएवढ्या गारा पडल्याने भाजीपाला आणि फळांसह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून हे नुकसान आता कसे भरुन काढायचे? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर, कामठी, पारशिवनी तालुक्यात मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास गारांसह मुसळधार पाऊस सुरू झाला. तब्बल दीड ते दोन तास कोसळलेल्या या पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक गावांमध्ये बोर आणि लिंबाच्या आकाराएवढ्या गारा पडल्या. संत्रा, मोसंबी या फळांना गारांचा फटका बसला. तर भाजीपाल्याचेही प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील दहेगाव, वलनी, सिल्लेवाडा, चनकापूर, पिपळा रोहना ही गावे तसेच कन्हान नदीकाठच्या गावांना गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. कामठी तालुक्यातील कोराडी, नांदा, महादुला ही गावे तसेच पारशिवनी तालुक्यातील काही गावांमध्ये गारांसह पाऊस पडला.


 या गावांमधील फळभाज्यांसह कापणीला आलेला तूर, कापूस, गहू, हरभरा या रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले. हवामान खात्याने सुरुवातीला आठ ते दहा जानेवारीपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. यावेळी नागपूर वगळता वर्ध्यासह इतर जिल्ह्यांना गारपिटीचा फटका बसला. त्यानंतर रविवारी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आणि गुरुवारपर्यंत हीच स्थिती कायम राहील असे सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून अधूनमधून पाऊस येत होता. मात्र, रविवारची सकाळ मुसळधार पावसाने झाली. नागपूर शहरातील रस्ते जलमय झाले. पण सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला. जिल्ह्यातील लोणखैरी, खापा, गुमठा, चिचोली ही गावेही गारपिटीच्या तडाख्यात सापडली. या गावांमध्येही मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाल्याचे बाजार समितीचे माजी संचालक हुकूमचंद आमधरे यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातही मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. बल्लारपूर तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. तर इतर तालुक्यातही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेजारच्या गडचिरोली जिल्ह्यातही अवकाळी पावसाने ठाण मांडले होते. गोंदिया जिल्ह्यातही सुमारे दीड तास वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला.

No comments