बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मीदरा परिसरात बुधवारी (ता. १२ ) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पडला आहे. या घटनेमुळे लोणी काळभोरसह आळंदी म्हातोबाची परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.


बुधवारी शेळ्यांच्या मालकासमक्ष कळपातील दोन शेळ्या बिबट्या नर व मादीने मारल्या असल्याने एकच खळबळ उडाली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी कांताताई देवराम बरडे (वय ६५, रा. कोंडेवस्ती, लोणी काळभोर) या आपल्या १७ शेळ्या घेऊन लोणी काळभोर व आळंदी म्हातोबाची ग्रामपंचायत हद्दीतील श्री क्षेत्र रामदरा व गवळेश्वर मंदीर परिसरात असलेल्या लक्ष्मीदरा येथे शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. साडेतीन वाजण्याच्या सुमारास बिबट्या नरमादी आले व त्यांनी चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर हल्ला चढवला. यामुळे शेळ्या सैरावैरा पळत सुटल्या.

 सदर ठिकाणी लोकांची चाहूल लागताच त्या दोन्ही बिबट्यांनी त्या ठिकाणावरून पलायन केले. व तेथे दोन शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या.
याबाबत वनरक्षक जागृती सातारकर यांनी सदर ठिकाणी भेट देऊन उपस्थित व परिसरातील नागरीकांना बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी. यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या