पाण्यात बुडवून तरुणाचा खून; दोन मित्रांच्या चौकशीतून झाला धक्कादायक खुलासा


आरोपी मित्रांनी सुरुवातीला मृत तरुणाच्या कुटुंबियांकडे उडवाउडवीची उत्तरे दिली.

अहमदनगरमध्ये तरुणाचा खून

३५ वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

दोन मित्रांनी कालव्याच्या पाण्यात बुडवून केला खून

आरोपींना पोलिसांनी केली अटक


अहमदनगर : कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथील नितीन अंकुश पोटरे (वय ३५) या बेपत्ता तरुणाचा त्याच्याच दोन मित्रांनी कालव्याच्या पाण्यात बुडवून खून केल्याचं उघड झालं आहे. आरोपी मित्रांनी सुरुवातीला मृत तरुणाच्या कुटुंबियांकडे उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांपुढे या आरोपींचा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मात्र, खुनाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेच्या दिवशी तिघा मित्रांनी एकत्र दारू प्यायली होती. पोलिसांनी तपास करून आनंद बबन परहर व जावेद अब्बास शेख (दोघे रा पिंपळवाडी ता. कर्जत ) यांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.


नितीन अंकुश पोटरे हा २३ जानेवारीपासून बेपत्ता झाला होता. मित्रांसोबत गेलेला तो परतलाच नव्हता. त्यानंतर मित्र उडावाउडवीची उत्तरे देत होते. शोधाशोध केल्यावर पोटरे याचा मृतदेह आढळून आला. पुढे तपासात त्याच्या मित्रांनीच त्याचा खून केल्याचं उघड झाल्याने त्यांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली. यासंबंधी महेश अंकुष पोटरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, घटनेच्या दिवशी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नितीन पोटरे घराबाहेर पडला. मी आनंद परहर व जावेद शेख या दोन मित्रांकडे जाऊन येतो, असं त्याने घरी सांगितलं होतं. मात्र रात्री तो परत आलाच नाही. त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी संजय पोटरे व इतर नातेवाईकांनी नितीन याचा सर्वत्र शोध घेतला मात्र काहीही हाती लागले नाही. दरम्यान जावेद शेख यांनी नितीन याची मोटरसायकल घरी आणून लावली. त्याने पोटरे यांच्या घरच्यांना सांगितलं की, मी नितीन व आनंद असे तिघेजण रात्री बरोबरच होतो. आम्ही तिघेही दारू प्यायलो होतो. त्यानंतर मी नितीनची गाडी घेऊन पुढे आलो आहे. तो खूप दारू प्यायला असल्यामुळे तो आनंद परहर याच्यासोबत होता. त्याच्याबद्दल मला अधिक काही माहिती नाही.

शेख याच्या या सांगण्यामुळे संशय वाढला. त्यामुळे पोटरे याच्या नातेवाईकांनी दुसरा मित्र आनंद परहर याच्याकडे चौकशी केली. त्याने सांगितलं की रात्री नऊ वाजता मी नितीन याला जावेद शेख याच्या घराजवळ सोडलं आहे. तेथून पुढे काय झालं, मला माहिती नाही. यामुळे गूढ आणि संशयही वाढत गेला. पोटरे याच्या नातेवाईकांनी पोलीीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. दोन दिवसांनी तळवडी शिवारामध्ये येसवडी कुकडी कॅनॉलच्या पाण्यामध्ये नितीन पोटरे यांचा मृतदेह आढळून आला. त्याचा चेहरा ओळखता येणार नाही, असा झाला होता. नातेवाईकांच्या मदतीने त्याची ओळख पटवण्यात आली.


दरम्यान, पोलीस निरीक्षक यादव यांनी तपासाची सूत्रे हलवली. मुख्य संशयित त्याचे दोन मित्र होते. ते उडाउडवीची उत्तरे देत होती. असंबंध माहिती देत होते. अखेर पोलिसी खाक्यासमोर त्यांचे हे खोटे दीर्घकाळ टिकले नाही. त्यांनी खून केल्याचं उघड झाल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली. मात्र, त्यांनी पोटरे याचा खून का केला, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या