कारेगाव-करडे रस्त्यावरील खड्डयामुळे अपघातास निमंत्रण


रांजणगाव गणपती : कारेगाव -

  करडे रस्त्यावर प्रचंड मोठया प्रमाणात खड्डे पडल्याने या रस्त्यावरुन जाताना वाहन चालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत असुन या खड्डयामुळे या रस्त्यावर अनेकवेळा अपघात होऊन काहीजण गंभीर जखमी झालेले आहेत. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.

कारेगाव-कारेगाव या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. शिरुरच्या पुर्व भागातील अनेक गावातील कामगार याच रस्त्याने औद्योगिक वसाहतीत रोजगारासाठी जात-येत असतात. परंतु सध्या या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने येथे अपघातांचे प्रमाण वाढले असुन रात्रीच्या वेळेस खड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होऊन अनेक वाहनचालकांना गंभीर दुखापत झालेली आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याने अजुनही याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. 

तसेच सध्या करडे-रांजणगाव गणपती या अष्टविनायक महामार्गाचे काम पुर्ण झाल्याने काही वाहनचालक आता करडे येथुन बाभूळसर खुर्द मार्गे कारेगाव येथुन औद्योगिक वसाहतीत जात आहेत. तसेच करडे-कारेगाव रस्त्यावर पडलेल्या प्रचंड खड्यांमुळे अनेक वाहनचालकांना मणक्याचे आजार उदभवले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावे अशी मागणी औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार व ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत शिरुर येथील सार्वजनिक बांधकाम  विभागाचे साहाय्यक अभियंता मयुर सोनवणे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

कोट:- 
करडे-कारेगाव रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तसेच शिरुरच्या पुर्व भागातून औद्योगिक वसाहतीत कामाला जाणाऱ्या कामगारांना हा जवळचा मार्ग आहे. परंतु सध्याची रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असल्याने या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याचे काम लवकरात लवकर हाती घेणे गरजेचे आहे.
राजेंद्र जगदाळे पाटील
जिल्हा परिषद सदस्य


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या