पाकिस्तानात बॉम्ब स्फोट ३ ठार २० जखमी

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या लाहोरमधील अनारकली बाजार येथे गुरुवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन जण ठार झाले असून किमान २० जण जखमी झाले आहेत. या स्फोटात टाइम डिव्हाईसचा वापर करण्यात आला होता, असं म्हटलं जातंय. ज्या ठिकाणी स्फोट झाला ते ठिकाण भारतीय वस्तूंच्या विक्रीसाठी ओळखले जाते, असे पोलिसांनी सांगितले.

लाहोर पोलिसांचे प्रवक्ते राणा आरिफ यांनी स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. या स्फोटामुळे जवळपासच्या दुकानांच्या आणि इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या,  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वस्तूंची विक्री होणाऱ्या पान मंडईजवळ हा स्फोट झाला.

दरम्यान, आतापर्यंत कोणत्याही गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. “आम्ही स्फोटाचे स्वरूप जाणून घेत आहोत. स्फोटात २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे,” असे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. मोहम्मद आबिद यांनी सांगितले. स्फोटाच्या ठिकाणी असलेल्या खड्ड्याने हा स्फोट टाइम डिव्हाईसने घडवून आणल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या