Breaking News

अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात, संपूर्ण देशवासियांचं लक्ष


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. दरम्यान यावेळीदेखील अर्थमंत्री पेपरविना अर्थसंकल्प मांडत आहेत. गेल्यावर्षीदेखील निर्मला सीतारामन यांनी टॅबच्या सहाय्याने अर्थसंकल्प मांडला होता. दरम्यान अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये उत्साह पहायला मिळाला. सेन्सेक्समध्ये सकाळी ५०० अंकाची वाझ पहायला मिळाली. तर दुसरीकडे सोमवारीदेखील चांगली वाढ पहायला मिळाली होती. आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात आर्थिक विकास दर आणि अनुकूल जागतिक संकेतांच्या आधारे सेन्सेक्समध्ये ८१३ अंकांची वाढ होऊन ५८ हजारांच्या पुढे जाईल अशी शक्यता व्यक्त केली होती. निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत आर्थिक पाहणी अहवाल (२०२१-२२) सादर केला. यावेळी करोना संकटामुळे दोलायमान झालेली देशाची अर्थव्यवस्था करोनापूर्व पातळीवर आली असून, ती आगामी आर्थिक वर्षांतील (२०२२-२३) संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्याइतकी मजबूत होऊ लागली आहे, त्यामुळे नव्या आर्थिक वर्षांत राष्ट्रीय सकल उत्पादनाचा वेग म्हणजे विकासदर ८ ते ८.५ टक्के राहू शकेल, असा आशावादी सूर यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये उमटला. दरम्यान अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारामन संसदेत दाखल झाल्या आहेत. करोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यस्थेला या अर्थसंकल्पामुळे गती मिळेल तसंच सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.

No comments