भीतीपोटी मराठवाडा जलसंजाल योजना बासनात


देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका

औरंगाबाद : दुष्काळमुक्त मराठवाडा करण्यासाठी या भागासाठी जलसंजाल (वॉटरग्रीड) योजना आमच्या सरकारने आणली होती. मात्र, या योजनाचा विद्यमान सरकारने खून केला, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. समुद्रात वाहून जाणारे १६७ टीएमसी (दशलक्ष घनमीटर) पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आले तर मराठवाडय़ातील माणूस पश्चिम महाराष्ट्राशी स्पर्धा करेल, या भीतीपोटीच सरकारने जलसंजाल योजना बासनात गुंडाळून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.

लासूर स्टेशन येथे आमदार प्रशांत बंब यांच्या ग्रामीण संगोष्टी या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मंचावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड होते. या प्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले,की ज्यांना मराठवाडय़ाने खूप दिले, पण त्यांच्याकडे या भागाविषयी भाषणातच स्थान आहे. या भागाविषयी द्वेष असल्यामुळेच मराठवाडय़ाची कवचकुंडलं काढली आहेत. मराठवाडय़ाला पैसा दिला का किंवा का नाही दिला, ही विचारणारी वैधानिक यंत्रणाच ठेवली नाही.

मराठवाडय़ातील शेतकऱ्याला अवर्षण, अतिवृष्टीचा सामना करावा लागतो. त्यामुळे दुष्काळमुक्त मराठवाडा करण्यासाठी आमच्या सरकारने आणलेल्या जलसंजाल योजनेचाही विद्यमान सरकारने खून केला. ही थंड डोक्याने केलेली हत्याच आहे. जलसंजाल ही योजना रद्द केली नाही, असे सांगत असले तरी एका गावापुरती मर्यादित ठेवली आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्यासाठी आम्ही मराठवाडा जलसंजाल योजना आखली. जलमंडलाची बैठक घेतली. आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या. जलआराखडाही तयार केला होता. अध्यादेशही काढले. मात्र, गेल्या दोन वर्षांत या योजनेचा एक कागदही पुढे सरकला नाही. ही योजना प्रत्यक्षात उतरू द्यायची नाही, कारण येथील माणूस पश्चिम महाराष्ट्राशी स्पर्धा करेल, अशी भीती सरकारला वाटते म्हणूनच मराठवाडा जलसंजाल ही योजना बासनात गुंडाळल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

मराठवाडय़ाच्या कवचकुंडलांचा खून

राज्यात कुठलीही वैधानिक यंत्रणा कार्यरत राहिली नाही. अनेक वर्षांच्या संघर्षांनंतर मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र, महाविकास आघाडी सरकारने वैधानिक मंडळांचा खून केला, असा आरोपही फडणवीस यांनी केला.

राणे, सोमय्या, राणांबाबत सूडाचे राजकारण

एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भेट घेणे हे नवीन नाही. तेलंगणाचे राव यांनी मी मुख्यमंत्री असताना भेट घेतलेली होती. मात्र, भाजपविरोधात एकजूट करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचा कुठेही परिणाम होणार नाही. उलट टीआरएस पार्टीचीच परिस्थिती तेलंगणात वाईट असून तेथे पुढील काळात भाजपच एक नंबर राहील, असे सांगत फडणवीस यांनी राणे, सोमय्यांसह रवी राणांबाबत सरकार सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या