गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार


 व्हिडिओ करण्याची धमकी दिली अन्..

पिंपरी : एका वकिलाने एका महिलेला कामानिमित्त हॉटेलवर भेटायला बोलावले. तिथे महिलेला गुंगीचे औषध दिले आणि बलात्कार करून महिलेचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडिओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वकिलाने वारंवार बलात्कार केला असल्याची फिर्याद संबंधित महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात दिली आहे. हा प्रकार जून, जुलै २०१८ ते तीन फेब्रुवारी २०२२ या कालावधीत पिंपरी, शिवाजीनगर, वडगावशेरी, खराडी या भागात घडला.

अॅड. अजय अप्पाराव साताळकर आणि दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजयने फिर्यादी महिलेसोबत ओळख वाढवून, मैत्री केली. शरीरसंबंधांच्या त्याच्या मागणीस मात्र फिर्यादीने स्पष्ट नकार दिला; तरीही एसआरए (पुनर्वसन प्रकल्पाचे) मोठे काम मिळाले असल्याचे सांगून पक्षकारांसोबत कामाबाबत बोलणी करून काम समजून घेण्यासाठी फिर्यादीला पिंपरी येथील एका हॉटेलमध्ये बोलावले.

हॉटेलवर पाण्यातून गुंगीचे औषध देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि फिर्यादीचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडिओ शूट केले. फिर्यादीसोबत लग्न करणार असल्याचे सांगून हा प्रकार कोणालाही न सांगण्याची आरोपीने धमकी दिली. आरोपीने फिर्यादीला पुन्हा भेटण्यासाठी संपर्क केला असता फिर्यादीने नकार दिला. त्यामुळे फिर्यादीचे फोटो 'व्हायरल' करण्याची धमकी देऊन आरोपीने फिर्यादीला विविध ठिकाणी बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

अन्य दोन महिला आरोपींनी फिर्यादीस मारहाण, शिवीगाळ व धमकी देऊन माफी मागण्यास सांगितले. त्याचा व्हिडिओ करून फिर्यादीचे फोटो व व्हिडिओ तिच्या बहिणीच्या मोबाइलवर पाठवले. फिर्यादीच्या पतीला ते फोटो दाखवून फिर्यादीला मानसिक, सामाजिक व शारीरिक त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या