एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न


श्रीरामपूर :
शहराजवळील गोंधवणी येथे एका दाम्पत्य आणि त्यांच्या दोन मुलांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, ही घटना वेळीच लक्षात आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चौघांच्याही जीवाचा धोका टळला असून सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल का उलचलं, याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर त्यांची पोलिसांकडून चौकशी केली जाईल, त्यानंतरच कारण स्पष्ट होणार आहे. गोंधवणी येथील रत्नाकर उत्तम सूर्यवंशी (वय ४७), लक्ष्मी रत्नाकर सूर्यवंशी (वय ३९), रुपेश रत्नाकर सूर्यवंशी (वय १९) आणि रेणुका रत्नाकर सूर्यवंशी (वय १७) यांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना शहरातील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

उपचार करणारे डॉ. रवींद्र जगधने यांनी सांगितलं की चौघांवरही उपचार सुरू आहेत. त्यांना २४ तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
या घटनेबद्दल पोलीस चौकशी करत आहेत. मात्र, यातील नेमकी माहिती कुटुंबियांचे जवाब नोंदवल्यानंतर कळू शकेल. या चौघांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? या मागे नेमके कारण काय? कोण जबाबदार आहे का? याबाबतचा तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या