राज्यात उन्हाचा चटका ; रात्रीसह दिवसाच्या तापमानात वाढ


पुणे :
दिवसा निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानामुळे राज्यात सध्या दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली असून, उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक ठिकाणी रात्री अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीचा गारवा कमी झाला आहे.

राज्यात गेल्या आठवडय़ापासून रात्रीच्या किमान तापमानात वाढ सुरू झाली होती. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार किमान तापमानात गेल्या तीन ते चार दिवसांत २ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सर्वच भागांत रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी वाढले आहे. मराठवाडा आणि विदर्भातही बहुतांश भागात किमान तापमान २ ते ४ अंशांनी वाढले आहे. अनेक भागांत गेल्या आठवडय़ात ११ ते १४ अंशांवर असलेला किमान तापमानाचा पारा आता १८ ते २० अंशांवर गेला आहे. त्यामुळे रात्रीचा गारवा कमी झाला आहे. मुंबईसह कोकण विभागात मात्र किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे. दिवसा आकाश निरभ्र रहात असल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील काही भाग वगळता इतरत्र ते सरासरीजवळ आले आहे. मध्य महाराष्ट्रात ३१ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान आहे. याच विभागात सोलापूर येथे रविवारी राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भातही कमाल तापमानाचा पारा ३१ ते ३४ अंशांवर आहे. कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुढील चार दिवस कोरडे हवामान राहणार आहे. विदर्भात मात्र २४ फेब्रुवारीला पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या